LatestNewsगोंदियाविदर्भ

कलपाथरी येथे मध्यरात्री अग्नितांडव; एकाच घरातील चार संसार जळून खाक, लाखो रुपयांची वित्तहानी

गोरेगाव : तालुक्यांतर्गत येणाऱ्या कलपाथरी येथे रविवार (ता. ७) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीत गजानन हेमने यांच्यासह त्यांच्या तीन मुलांचे संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. एकाच छताखाली मात्र वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहणाऱ्या या चारही कुटुंबांचे धान्य, कपडे, कागदपत्रे आणि शेतीचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कलपाथरी येथील रहिवासी गजानन तुकाराम हेमने हे आपली मुले राजकुमार हेमने, दिलीप हेमने आणि सुनील हेमने यांच्यासह एकाच मोठ्या घरात वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहतात. रविवारी रात्री सर्व कुटुंबीय गाढ झोपेत असताना अचानक घराला आग लागली. काही वेळातच या आगीने रौद्र रूप धारण केले आणि ती गजानन हेमने यांच्या खोलीसह तिन्ही मुलांच्या खोल्यांमध्ये पसरली. आगीची भीषणता पाहून परिसरात एकच खळबळ उडाली.
धान्य, कपड्यांसह शेतीची साधने खाक
आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आगीचा जोर इतका मोठा होता की, घरातील संपूर्ण अन्नधान्य, कपडे, फर्निचर, मौल्यवान वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे आणि आगामी खरीप हंगामासाठी आणलेली शेतीची साधने जळून खाक झाली. या आगीत चारही कुटुंबांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून ते उघड्यावर आले आहेत.
लोकप्रतिनिधींकडून पाहणी; मदतीचे आश्वासन
घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती डॉ. लक्ष्मण भगत, पंचायत समितीचे उपसभापती रामेश्वर महारवाडे आणि माजी सभापती मनोज बोपचे यांनी कलपाथरी गावाला भेट देऊन घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी पीडित हेमने कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि नुकसानीची सविस्तर माहिती घेतली. तसेच, नुकसानग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांना प्रशासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. या भयानक आपत्तीमुळे हेमने कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून, प्रशासनाने तातडीने पंचनामा करून त्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी कलपाथरी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *