LatestNewsगोंदियाविदर्भ

बोदलकसा जलाशयात डोंगा उलटून दोघांना जलसमाधी; ७ जण बचावले

पार्टी बेतली जीवावर : तिरोडा तालुक्यातील बरबसपुरा येथील घटना, परिसरात हळहळ
तिरोडा :
पार्टी साजरा करण्याचा आनंद काही क्षणांतच शोकात बदलल्याची एक अत्यंत हृदयद्रावक घटना बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. जिल्ह्यातील प्रसिद्ध बोदलकसा जलाशयाच्या वाघमंदिर शिवारात पार्टी साजरी करण्यासाठी गेलेल्या नऊ मित्रांपैकी दोन तरुणांचा डोंगा (छोटी होडी) पाण्यात उलटल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. तर ७ जण सुदैवाने थोडक्यात बचावले. कुणाल शालिक भोंडे (२०) व मोहित वसंत रहांगडाले (२१, दोघेही रा. बरबसपुरा, तिरोडा) अशी मृत पावलेल्या दुर्दैवी तरुणांची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण तिरोडा तालुक्यात शोककळा पसरली आहे.
नौकाविहाराचा मोह नडला मिळालेल्या माहितीनुसार, बरबसपुरा येथील मोहित रहांगडाले, कुणाल भोंडे, अक्षय बिसेन, राकेश लाडे, निखिल पटले, लक्की रहांगडाले, प्रलय पारधी, मनीष कोकूडे आणि अविनाश टेकाम हे नऊ मित्र बुधवार निमित्त पार्टी साजरी करण्यासाठी बोदलकसा जलाशय परिसरात गेले होते. जलाशया जवळील ओव्हर रस्त्यावरील वाघ मंदिर परिसरात सर्वजण पार्टीचा आनंद घेत होते. दरम्यान, त्यांना तिथेच बाजूला एक डोंगा पडलेला दिसला. या डोंगा पाहून युवकांना जलाशयात नौकाविहार करण्याचा मोह आवरला नाही. सुरक्षेची कसलीही पर्वा न करता सर्वजण तो डोंगा घेऊन जलाशयाच्या पाण्यात उतरले. सुरुवातीला सर्वकाही सुरळीत सुरू असताना, अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने आणि क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्याने डोंग्याचा तोल गेला. काही क्षणातच डोंगा भर पाण्यात उलटला. डोंगा उलटताच सर्व तरुणांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि जीव वाचवण्यासाठी त्यांची कासावीस धडपड सुरू झाली. यातील काही तरुणांना पोहता येत असल्याने त्यांनी कसाबसा पाण्याचा प्रवाह कापून किनारा गाठला. मात्र, मोहित रहांगडाले आणि कुणाल भोंडे या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात बुडू लागले आणि काही वेळातच त्यांचा जलसमाधी मिळून अंत झाला. आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून मृतदेह बाहेर या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरात खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच तिरोडा पोलीस आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने तातडीने शोधमोहीम सुरू केली.
………………………………….
एकाच गावातील दोन कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर
मृत कुणाल भोंडे (२०) आणि मोहित रहांगडाले (२१) हे दोघेही बरबसपुरा येथील रहिवासी असून एकमेकांचे जीवलग मित्र होते. तरुण मुलांचा असा अचानक आणि दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटना समजताच गावातील ग्रामस्थांनी बोदलकसाकडे धाव घेतली होती. संपूर्ण गावातील चुली आज पेटल्या नव्हत्या, इतके शोकाकुल वातावरण गावात होते.
……………………………
पावसाळा किंवा पर्यटनाच्या दिवसांत जलाशयांवर जाताना तरुणाई अनेकदा उत्साहाच्या भरात सुरक्षेचे नियम पायदळी तुडवते. अनोळखी ठिकाणी पोहण्याचा किंवा अनधिकृत बोटीतून प्रवास करण्याचा मोह जीवावर बेतू शकतो. बोदलकसा येथील दुर्घटना ही अशाच निष्काळजीपणाचा फटका आहे. पर्यटकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *