St Bus Seva: स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही त्या गावांना एसटीची प्रतिक्षा
असुविधेमुळे ग्रामीणांचे हाल : केव्हापर्यत उपेक्षित रहायचं; नागरिकांचा सवाल
देवरी : नुकताच स्वातंत्रदिन सोहळा साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याचे ७८ वर्षे लोटूनही देवरी तालुक्यातील आदिवासी भागातील अनेक गावांना अद्यापही एसटी बसची प्रतिक्षा लागून आहे. ग्रामपंचायत म्हैसुली अंतर्गत महाजनटोला, बिचटोला, मडावीटोला, (म्हैसुली) या गावात अद्यापही लालपरी पोहोचली नसून केव्हापर्यत दळणवळणांच्या सोयीसाठी उपेक्षित जीवन जगायचं? असा संतप्त सवाल आदिवासी नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. लोकप्रतिनिधी येतात आणि आश्वासन देवून जातात, परंतु, आमच्या समस्या सोडविणारा कुणीच नाही? अशी भावना त्या गावातील नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, गावकर्यांवर राज्य परिवहन मंडळाला साकडे घातले आहे. त्यामुळे शासन त्यांच्यापर्यत पोहोचणार का? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
देवरी तालुका आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त तालुका आहे. तालुक्याची सिमा गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगढ राज्याला लागून आहे. दुर्गम भागात तालुक्यातील अनेक क्षेत्र मोडत असतात. त्यामुळे या गावातील नागरिकांना आजही दळणवळणाच्या सुविधांसाठी ‘जुगाड’ शोधावे लागते. देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षाचा मोठा कालावधी लोटला आहे. परंतु, दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या काही कमी होताना दिसून येत नाही. म्हैसुली अंतर्गत महाजनटोला, बिचटोला, मडावीटोला, (म्हैसुली) या गावात अद्यापही एसटीची प्रतिक्षा लागली आहे. गावापर्यत एसटी बससेवा उपलब्ध व्हावी, यासाठी गावकरी जनप्रतिनिधींना वारंवार निवेदन करुन थकले आहेत. परंतु, निवडणुकीच्या कालावधीत मिळालेल्या आश्वासन एकाही जनप्रतिनिधीने पुर्ण केले नाही. त्यामुळे केव्हापर्यत दळणवळण व प्रवासी सुविधांसाठी संघर्ष करावे, असा प्रश्न उपस्थित करून शासन व लोकप्रतिनिधीच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.

……………………
गावातील विद्यार्थ्यांना शिक्षण व गावकर्यांना दैनंदिन काम, उपचार, शासकीय कामांसाठी तत्काळ रहावे लागते. प्रवासी साधने उपलब्ध नसल्याने याचा मोठा फटका बसत आहे. देशाचे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. पण म्हैसुलीसह गावे अनेक सोयी-सुविधांपासून उपेक्षितच आहेत. आजही प्राथमिक सोयी-सुविधांसाठी झटत रहावे लागत आहे.
………………..
राज्य परिवहन महामंडळाला निवेदन
देवरीवरुन देवरी, चिचगड ते म्हैसुली मार्गावर सकाळी ९:०० ते दुपारी १:०० व सांयकाळी ५:०० वाजे पर्यंतची बस सरु करण्यात यावी, यासाठी अनेकदा निवेदन ग्रामस्थाकडुन करण्यात आले. सन २०२३-२४ मध्ये बस सेवा सुरू करण्यासाठी सर्वे देखील करण्यात आला. यात मरामजोब, मासुलकसा, मंगेझरी, म्हैसुली ते म्हैसुली फाटा बस स्टॉपपर्यंत सर्वे करण्यात आले. परंतु, त्य सर्वेक्षणाचे झाले काय? हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे आमचा सुड न घेता बससेवा सुरू करावी, अशी मागणी जगन सलामे, राजकुमार सलामे, माणिक कोरेटी, विजय धुर्वे, बाबुलाल सलामे, जगत नुरेटी, हेमराज सलामे, अनिल कोरेटी, स्वप्नील कोल्हारे, ईश्वर कोल्हारे यांनी राज्य परिवहन महामंडळाकडे करण्यात आली आहे.

