LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता जमा; अमरावती जिल्ह्यातील २.८२ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी २००० रुपये!

खरिपाच्या हंगामात अन्नदात्याला मोठा दिलासा; जिल्ह्यात ९८ टक्के ई-केवायसी पूर्ण, ‘या’ कारणामुळे ६,२४८ जणांचे लाभ रखडले
अमरावती :
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेचा बहुप्रतीक्षित २३ वा हप्ता शनिवार, २० जून रोजी अधिकृतपणे जारी करण्यात आला आहे. या अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील २ लाख ८१ हजार ९७४ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (DBT) माध्यमातून प्रत्येकी २,००० रुपयांची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. खरिपाचा हंगाम सुरू असतानाच ही मदत मिळाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील तारकेश्वर (हुगळी) येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमातून या योजनेच्या निधीचे वितरण केले. अमरावती जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केली होती, त्यांनाच या हप्त्याचा लाभ देण्यात आला आहे. यापूर्वी पात्र शेतकऱ्यांना २२ हप्त्यांचा लाभ मिळालेला आहे. दरम्यान, योजनेत अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचे लाभ बंद करण्यात आले असून, सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी करणे आता पूर्णपणे अनिवार्य करण्यात आले आहे.
अमरावती जिल्ह्यात एकूण २ लाख ८८ हजार २२२ नोंदणीकृत शेतकरी आहेत. यापैकी २ लाख ८१ हजार ९७४ शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. म्हणजेच जिल्ह्यात एकूण ९८ टक्के ई-केवायसी पूर्ण झाली आहे. यामध्ये धारणी, अमरावती आणि चांदूर बाजार या तालुक्यांमध्ये सर्वाधिक ९९ टक्के शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली आहे, तर चिखलदरा तालुक्यात हा आकडा ९५ टक्के इतका आहे.
……………….
६,२४८ शेतकऱ्यांचे लाभ तूर्तास रखडले
जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ई-केवायसी केलेली नाही किंवा एग्रीस्टॅक (AgriStack) योजनेत नोंदणी केलेली नाही, त्यांना या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे. जिल्ह्यात अशा ६,२४८ लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याने त्यांचा लाभ तूर्तास रोखून धरण्यात आला आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
……………………
काय आहे पीएम किसान योजना आणि कोणाला मिळतो लाभ?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्ष ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम २,००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेचा लाभ अशा अल्प व भूधारक शेतकरी कुटुंबांना मिळतो, ज्यांच्या नावावर शेतजमिनीची वैध नोंद उपलब्ध आहे आणि ज्यांचे ई-केवायसी पूर्ण असण्यासोबतच बँक खाते अधिकृत ओळख दस्तऐवजांशी आणि लिंक आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *