नानवा पूल व रस्त्याच्या कामावरून आमदार संजय पुराम यांच्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक
१५ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाचा इशारा!निवडणुकीपूर्वी दिले होते प्राधान्याने काम करण्याचे आश्वासन; पावसात संपर्क तुटल्याने नागरिकांचे हाल
सालेकसा (गोंदिया) : सालेकसा तालुक्यातील नानवा ग्रामपंचायत क्षेत्रातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पूल व रस्ता बांधकामाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आमदार संजय पुराम यांनी निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पाळले नसल्याचा आरोप करत स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आमदार होऊन सुमारे दोन वर्षे उलटल्यानंतरही नानवा येथील पूल व रस्त्याचे काम सुरू झाले नसल्याने परिसरात लोकप्रतिनिधींविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. जर प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी यावर तातडीने निर्णय घेतला नाही, तर येत्या १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार संजय पुराम यांनी जाहीर सभांमध्ये आश्वासन दिले होते की, निवडून येऊन शपथ घेतल्यानंतर सर्वात आधी नानवा पूल आणि रस्त्याचे काम सुरू केले जाईल. मात्र, दोन वर्षे उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. सालेकसा-नानवा मार्गावरील पूल पावसाळ्यात पाण्याखाली जातो, ज्यामुळे अनेक दिवस वाहतूक पूर्णपणे ठप्प असते. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण आणि दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना बसत आहे. डांबरी रस्ता खड्ड्यांमुळे जर्जर झाला असून अपघातांचा धोका वाढला आहे.१० वर्षांपासून मागणी प्रलंबित; १५ ऑगस्टपासून आंदोलनाचा पवित्रानानवा ग्रामपंचायतीचे सरपंच गौरीशंकर बिसेन यांनी सांगितले की, गेल्या १० वर्षांपासून या पुलाच्या बांधकामाची मागणी सातत्याने केली जात आहे. या मुद्द्यावरून ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचा इशाराही दिला होता. त्यावेळी आमदारांनी काम त्वरित सुरू करण्याचे आश्वासन दिले, मात्र आतापर्यंत केवळ आश्वासनेच मिळाली आहेत. त्यामुळे आता केवळ पोकळ घोषणा नको तर प्रत्यक्ष जमिनीवर काम सुरू झालेले पाहायचे आहे, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत, शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू केले जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन व लोकप्रतिनिधींची असेल, असा इशारा देण्यात आला आहे.
आमदार संजय पुराम यांचे स्पष्टीकरण”
नानवा पूल व रस्त्याचे काम स्वीकृत प्रकल्पांच्या यादीत समाविष्ट आहे. येत्या दिवाळीनंतर या कामाला गती दिली जाईल. क्षेत्रातील जनतेचा विश्वास कधीही तुटू देणार नाही. यासोबतच सुमारे ४०० कोटी रुपयांच्या खर्चातून होणाऱ्या कुआडांस-मध्य प्रदेश मार्गाच्या विकासाचे कामही लवकरच सुरू केले जाईल. क्षेत्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून दिलेला शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.”
— संजय पुराम, आमदार, आमगाव – देवरी विधानसभा क्षेत्र

