गोंदियात राज्य उत्पादन शुल्काचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; एकाच वेळी ७२ गुन्हे दाखल, दारूमाफियांचे धाबे दणाणले!
१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; ३४ हजार लिटर मोहा सडवा नष्ट!
गोंदिया : जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत अवैध दारूमाफियांचे धाबे दणाणून सोडले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभाग गोंदिया, देवरी विभाग आणि भरारी पथकाने संयुक्तपणे २९ मे ते ४ जून दरम्यान जिल्ह्यातील विविध भागात धाडी टाकून तब्बल ७२ गुन्हे नोंदवले आहेत. या मोठ्या कारवाईत ४५ आरोपींना अटक करण्यात आली असून, एकूण १६ लाख ७ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तिरोडा, सुकडी, कोडेलोहारा, लेंडझरी, पांगळी, शाहरावाणी, गोंदेखारी, आसोली आणि गोरेगाव या परिसरातील अवैध दारू अड्ड्यांवर अचानक छापे टाकण्यात आले. या मोहिमेत ७८३ लिटर मोहा दारू, ३४ हजार ८१० लिटर मोहा सडवा (रसायन), ६३.८३ लिटर देशी दारू, ७९८ लिटर विदेशी दारू, ९ लिटर बिअर आणि ५० लिटर ताडी असा एकूण अवाढव्य दारूसाठा हस्तगत करण्यात आला. तसेच दारूची बेकायदेशीर वाहतूक करणारी ३ दुचाकी वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.
ही धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक मनोहर अंचुले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ए.एम. जुमडे, ए.ओ. गभणे, दुय्यम निरीक्षक डी. बी. सव्वालाखे यांच्यासह २६ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायात गुंतलेल्या घटकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून, विभागाने यापुढेही अशीच कडक मोहीम सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.

