LatestNewsगोंदियाविदर्भ

गोंदिया पोलिसांचा स्तुत्य उपक्रम: ‘संडे ऑन सायकल’ रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद; २५० हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग

आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि पोलीस-जनता ऐक्याचा दिला अनोखा संदेश
गोंदिया:
“सुदृढ शरीर, सशक्त मन आणि सुरक्षित समाज” या प्रेरणादायी संकल्पनेला मूर्त रूप देत गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जागतिक सायकल दिन आणि ‘फिट इंडिया अभियाना’चे औचित्य साधून रविवारी (६ जून) ‘संडे ऑन सायकल’ या विशेष रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला गोंदियाकरांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून, पोलीस आणि नागरिक अशा सुमारे २५० हून अधिक सायकलस्वारांनी एकत्र पेडल मारत आरोग्याचा नवा मंत्र दिला.
पंतप्रधानांनी सुरू केलेल्या ‘फिट इंडिया’ अभियानाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे, आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आणि पोलीस-जनता संबंध अधिक दृढ करणे या उद्देशाने पोलीस मुख्यालय, कारंजा येथे या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

पहाटेच्या प्रसन्न वातावरणात पोलीस अधिकारी, अंमलदार, त्यांचे कुटुंबीय, पोलीस मित्र, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभारी पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या ५ किलोमीटर अंतराच्या सायकल रॅलीला उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांनी हिरवी झेंडी दाखवली. फुलचूर मार्गे मार्गक्रमण करत अतिशय शिस्तीत आणि उत्साहात ही रॅली पुन्हा पोलीस मुख्यालय येथे विसावली.
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे खाकी वर्दीतील कर्तव्यकठोरता बाजूला ठेवून पोलीस अधिकारी आणि सामान्य नागरिक एकाच रंगात रंगून गेले होते. सायकलिंग ही केवळ शारीरिक तंदुरुस्तीची साधना नसून स्वच्छ पर्यावरण, मानसिक स्वास्थ्य आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचा मार्ग आहे, हा संदेश यातून देण्यात आला. सहभागींनी नियमित व्यायाम आणि सायकलिंगचे आवाहन स्वीकारले.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभारी पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर, प्रभारी पोलीस उपाधीक्षक (गृह) रामदास शेवते, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नागेश भास्कर, राखीव पोलीस निरीक्षक राजेश सरोदे व दीपक शेंडे, नक्षल सेलचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत हत्तीमारे यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. या रॅलीत ‘संडे सायकल ग्रुप, गोंदिया’ चे सदस्य आणि आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध धावपटू मुन्ना यादव यांनी विशेष उपस्थिती नोंदवून उपक्रमाची शोभा वाढवली.
आरोग्यदायी नागरिक हीच राष्ट्राची ताकद
गोंदिया पोलिसांचा हा “संडे ऑन सायकल” उपक्रम केवळ एक इव्हेंट न राहता आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि पोलीस–जनता सहभाग यांचा एक प्रेरणादायी उत्सव ठरला. “आरोग्यदायी नागरिक हेच राष्ट्राची खरी ताकद आहेत” हा संदेश यातून अधोरेखित झाला.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *