स्टील कोईलच्या आड गांजा तस्करी उघड; नागपुरात १५० किलो गांजा जप्त
ओडिशातून चालणारी आंतरराज्यीय तस्करीची साखळीचा पर्दाफास
नागपूर : औद्योगिक वापराच्या स्टील कोईलच्या नावाखाली ओडिशातून नागपूरमार्गे होणारी अमली पदार्थांची मोठी तस्करी नागपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने यशस्वीपणे हाणून पाडली आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (एसएसबी) ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत मंगळवारी पहाटे पारडी परिसरात एका नियोजनबद्ध मोहिमेद्वारे धडक कारवाई केली. या कारवाईत ट्रकमधून तब्बल १५० किलो ५२० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, ओडिशातून चालणारे आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करीचे मोठे जाळे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पारडी पोलिसांनी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून जोगेज्ञ देबुरी (वय ३०) आणि महेंद्र देबुरी (वय ४०, दोन्ही रा. अंगुरी, ओडिशा) या दोन आंतरराज्यीय तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत.पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे एसएसबीच्या पथकाने मंगळवारी पहाटे नागपूर-हैदराबाद रोडवरील पारडी येथील जोगिंदर सिंग ढाब्यासमोर सापळा रचला होता. पहाटे ४.४० वाजताच्या सुमारास ओडिशाहून आलेला एक संशयास्पद ट्रक तपासणीसाठी थांबवण्यात आला. ट्रकमध्ये तब्बल २१.२६० टन वजनाचे स्टील कोईल लोड असल्याने सुरुवातीला तो नेहमीचाच औद्योगिक माल असल्याचे भासत होते. मात्र, पोलिसांनी तीक्ष्ण नजरेने वाहनाची कसून झडती घेतली असता, स्टील कोईलच्या खाली अत्यंत चालाखीने लपवून ठेवलेला गांजाचा साठा आढळून आला. या कारवाईत पोलिसांनी ३७ लाख ६३ हजार रुपये किमतीचा गांजा, ४० लाख रुपयांचा ट्रक, ६१ लाख ९८ हजार रुपयांचे स्टील कोईल आणि १८ हजार रुपयांचे दोन मोबाईल असा एकूण ४१ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.देशाच्या मध्यभागी असलेल्या भौगोलिक स्थितीमुळे तस्कर नागपूरचा वापर ‘ड्रग्ज ट्रान्झिट हब’ म्हणून करण्याचा प्रयत्न करत असतात; मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे तस्करांचा हा डाव पुरता उधळला गेला आहे. या धडक कारवाईनंतर बोलताना नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी तस्करांना कडक इशारा दिला आहे. शहराचा वापर अमली पदार्थांच्या वाहतुकीसाठी करणाऱ्यांची गच्छंती थेट तुरुंगात निश्चित आहे, असे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, समाजाला विष देऊन नफा कमवू पाहणाऱ्यांना कायद्याचा कठोर सामना करावा लागेल. अमली पदार्थांची पुरवठा साखळी पूर्णपणे उद्ध्वस्त करणे आणि तरुणाईला या विळख्यातून वाचवून नागपूरला सुरक्षित व प्रगत शहर बनवणे, हाच ‘ऑपरेशन थंडर’चा मुख्य उद्देश असल्याचेही पोलीस आयुक्तांनी नमूद केले.

