मजुरांच्या हक्कावर डल्ला! योजनेच्या लाभासाठी गुरुजींनीच रचला बनाव
खोटी व बनावटी कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक; आरोपी शिक्षकावर फौजदारी गुन्हा दाखल
गोंदिया : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या विविध लाभांच्या योजनांचा गैरफायदा घेण्यासाठी एका सहायक शिक्षकाने स्वतःला बांधकाम कामगार दाखवून शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी बोगस कामगार बनून यंत्रणेवर दबाव आणणाऱ्या शिक्षकाविरुद्ध डुग्गीपार पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश गुलाब बागळकर (वय ३७, रा. खोबा, ता. सडक अर्जुनी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी सहायक शिक्षकाचे नाव आहे.
९० दिवस काम केल्याचे दाखवले बनावट प्रमाणपत्र
राज्य शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्फे असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी विविध कल्याणकारी आणि आर्थिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार खरोखरच बांधकाम कामगार असणे आणि तसे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. आरोपी उमेश बागळकर हा एका शाळेत सहायक शिक्षक म्हणून शासकीय वेतनावर कार्यरत असतानाही, त्याने १२ मार्च २०२५ पूर्वी बांधकाम कामगार म्हणून मंडळाकडे नोंदणी केली. एवढेच नव्हे तर या नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी आपण ९० दिवस बांधकाम मजूर म्हणून काम केल्याचे एक खोटे व बनावट प्रमाणपत्रही विभागाच्या पोर्टलवर अपलोड केले.
विभागाच्या कर्मचाऱ्यांवरच आणला होता दबाव
कागदपत्रांमधील त्रुटींमुळे योजनेचा लाभ मिळण्यास विलंब होत असल्याचे लक्षात येताच, या तोतया कामगार तथा शिक्षकाने स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी उलट विभागाच्या कर्मचाऱ्यांविरुद्धच खोट्या तक्रारी करण्यास सुरुवात केली. कागदपत्रांचे नूतनीकरण करून घेण्यासाठी त्याने शासकीय यंत्रणेवर मोठा दबाव आणण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्याच्या संशयास्पद हालचाली आणि कागदपत्रांची पडताळणी केली असता, हा संपूर्ण प्रकार बोगस असल्याचे आणि त्याने शासनाची दिशाभूल केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
अखेर या फसवणूक प्रकरणाची गंभीर दखल घेत विभागाच्या अधिकारी श्रीमती मंगला मसराम यांनी डुग्गीपार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षक उमेश बागळकर विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१८ (२) आणि ३३६ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी कठाणे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. एका जबाबदार शिक्षकानेच अशा प्रकारे बोगस कागदपत्रे तयार करून मजुरांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.

