LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

पोलिसांचा ताण-तणाव दूर करण्यासाठी गोंदियात ‘ध्यान साधना’ शिबीर; १३५ अधिकारी व अंमलदारांची उपस्थिती

गोंदिया : आजच्या धकाधकीच्या युगात पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदार दिवसरात्र आपले कर्तव्य बजावत असतात. सततच्या बंदोबस्तामुळे आणि कामाच्या स्वरूपामुळे पोलिसांमध्ये विविध आजार तसेच ताण-तणावाची पातळी वाढणे ही अत्यंत चिंतेची बाब बनली आहे. या पार्श्वभूमीवर, पोलिसांचे शरीर निरोगी राहावे व त्यांना मानसिक तणावातून मुक्ती मिळावी या संकल्पनेतून पोलीस मुख्यालय गोंदिया (कारंजा) येथील प्रेरणा सभागृहात शनिवारी (दि. ६) ‘मानसिक आरोग्य आणि कल्याण’ या विषयावर भव्य ध्यान साधना शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस अधीक्षक मा. श्री. गोरख भामरे आणि अपर पोलीस अधीक्षक (कॅम्प देवरी) श्री. अभय डोंगरे यांच्या विशेष पुढाकारातून या कल्याणकारी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ध्यान साधना हाच तणावमुक्तीचा प्रभावी मार्ग : या शिबिरात राजयोग एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशन (RERF), ज्ञान सरोवर अकादमी, माऊंट अबू (राजस्थान) येथील प्रसिद्ध मार्गदर्शक डॉ. ई.व्ही. स्वामीनाथन, शैलेंद्र भाई, कॅप्टन शिव सिंग, रत्नमाला दिदी तसेच ब्रह्मकुमारी गोंदिया येथील विनोद हरिणखेडे, नम्रता बहेन, लीलाधर भाई व यादोराव मस्के उपस्थित होते. गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
मार्गदर्शकांनी उपस्थित पोलिसांना संबोधित करताना सांगितले की, “जगभरातील संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी ध्यान साधना हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे.” या शिबिरात स्वतःच्या मनाशी संवाद साधणे, ताण ओळखणे आणि तो सकारात्मक पद्धतीने हाताळून नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे वाटचाल कशी करावी, याचे मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. पोलिसांना मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम, आत्मविश्वासी व संतुलित बनवण्यासोबतच भावनिक समतोल, निर्णयक्षमता आणि जीवनकौशल्ये विकसित करण्यावरही भर देण्यात आला. मार्गदर्शनपर सत्रानंतर सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रत्यक्ष ध्यान साधनेचा अनुभूतीपर सरावही करून घेण्यात आला. या विशेष शिबिरात पोलीस उप-अधीक्षक (मुख्यालय) श्री. रामदास शेवते, पोलीस निरीक्षक श्रीमती नंदिनी चानपुरकर यांच्यासह गोंदिया जिल्ह्यातील जवळपास १३५ पोलीस अधिकारी व अंमलदारांनी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक श्रीमती नंदिनी चानपुरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सालेकसा पोलीस ठाण्याचे ठाणेदार भूषण बुराडे यांनी मानले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी पोनि नंदिनी चानपुरकर, रापोनि राजेश सरोदे, सफौ मुस्तफा सरवर, पोहवा चंद्रकांत बरकुंड, संतोष चौधरी, राज वैद्य, पोकॉ अतुल कोल्हाटकर, मपोकॉ पल्लवी गजभिये तसेच पोलीस मुख्यालय गोंदिया येथील डी. आय. स्टाफने अथक परिश्रम घेतले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *