मोठी स्वप्नं आणि दृढ आत्मविश्वास यशाचा मार्ग खुला करतात – जयंत शुक्ला
अर्जुनी/मोर येथे “आमदार चषक” जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न
अर्जुनी/मोर (प्रतिनिधी): तालुका क्रीडा संकुल, अर्जुनी/मोर येथे आयोजित “आमदार चषक” जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा २०२५-२६ चा पारितोषिक वितरण सोहळा २२ मार्च २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या भव्य स्पर्धेचे उद्घाटन २० मार्च रोजी माननीय आमदार राजकुमारजी बडोले यांच्या हस्ते झाले होते. समारोप प्रसंगी विजेत्या खेळाडूंना रोख रक्कम व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ पत्रकार व भाजप जिल्हा सचिव जयंतजी शुक्ला होते. यावेळी त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की, “मोठी स्वप्नं बघण्याची हिंमत आणि ती पूर्ण करण्यासाठी दृढ आत्मविश्वास व सातत्यपूर्ण परिश्रम आवश्यक असतात; तेव्हाच यश मिळते.” प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित योग प्रचारक दादाजी फुंडे यांनी खेळाडूंना शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक संतुलन राखण्याचा सल्ला दिला. याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजयजी कापगते, भाजपा युवामोर्चा जिल्हा सचिव अश्विनसिंह गौतम, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष सुधांशु मेहता, सामाजिक कार्यकर्ता निखिल नाकाडे, युथ इन ऍक्शन संघटना सरचिटणीस नयन रुखमोडे, सुनील पवार, धनराज आहुजा, किशोर राठोड, नितुताई पवार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.जिल्ह्यातील तब्बल २८४ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. मुलांच्या वयोगटातील निकालात ११ वर्षांखालील गटात अद्विक शहारे याने प्रथम, तर नियोग डोंगरेवार याने द्वितीय क्रमांक पटकावला. १३ वर्षांखालील गटात संकल्प असाई आणि प्रतिक खटके, १५ वर्षांखालील गटात अर्थर्व गोस्वामी व विहंग बनसोड, १७ वर्षांखालील गटात पार्थ यादव व नितेश भुतडा, तर १९ वर्षांखालील गटात सिद्धार्थ पवार आणि व्योम यांनी विजय मिळवला. १९ वर्षांखालील मुलांच्या दुहेरी गटात पार्थ यादव व भूपेश हत्तीमारे यांच्या जोडीने प्रथम स्थान मिळवले, तर नितेश भुतडा व पार्थ हटवार यांची जोडी द्वितीय क्रमांकावर राहिली. खुल्या प्रवर्गात योगेश्वर डोंगरेवार यांनी प्रथम तर पवार सर यांनी द्वितीय स्थान प्राप्त केले. ज्येष्ठ नागरिकांच्या ४० व ५० वर्षांवरील दोन्ही गटांत धनराज आहुजा व राजेश व्यास या जोडीने उत्कृष्ट खेळ करत पहिले स्थान पटकावले. मुलींच्या स्पर्धेत U-11 गटात तेजस्विनी पवार, U-13 मध्ये अमिती शहारे, U-15 मध्ये चारवी राणे, U-17 मध्ये खुशी बुरले, तर U-19 वयोगटात अदिती मेश्राम हिने प्रथम क्रमांक पटकावला. ओपन मुलींच्या गटात अभिषा चौधरी आणि +४० वयोगटात माधुरी बनवे प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी वनवे मॅडम यांनी प्रभावीपणे केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव डॉ. महेंद्र हेमणे, क्रीडा प्रशिक्षक थानेद्रसिंह पवार, रेफरी युवराज वाघमारे, क्रीडा शिक्षक पुरुषोत्तम घाटोळे, तसेच माधुरी वानवे, पार्थ तवाडे, किशोर तवाडे, शैलेंद्र फुंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे जिल्ह्यात क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. सर्व विजेत्यांचे सर्वत्र कौतुक होत असून क्रीडा प्रेमींकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

