LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

चिचगड पोलिसांची धडक कारवाई: फिल्मी स्टाईलने पाठलाग करून २.८१ लाखांची विदेशी दारू व कार जप्त!

गोंदिया (प्रतिनिधी) : चिचगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या सुमारास गस्त घालत असलेल्या पोलीस पथकाने एका संशयास्पद कारचा थरारक पाठलाग करून विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केला आहे. ही धडक कारवाई गोठनपार-वडेकसा दरम्यान असलेल्या वनविभागाच्या परिसरात करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी गोवा बनावटीची विदेशी दारू आणि चारचाकी वाहन असा एकूण २ लाख ८१ हजार १८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, अंधाराचा फायदा घेऊन फरार झालेल्या आरोपी चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, चिचगड पोलीस ठाण्याचे कर्मचारी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास परिसरात गस्त घालत होते. यादरम्यान ककोडीच्या दिशेने जाणारी एक संशयास्पद चारचाकी कार (क्रमांक सीजी ०८ – एजे ८३३४) पोलिसांना दिसली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी वाहन थांबवण्याचा इशारा केला. मात्र, पोलिसांना पाहताच चालकाने वाहनाचा वेग वाढवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्परता दाखवत तात्काळ त्या संशयास्पद कारचा पाठलाग सुरू केला. अखेर गोठनपार ते वडेकसा दरम्यानच्या वनक्षेत्रात पोलिसांनी कारला घेरले. पोलीस जवळ येत असल्याचे पाहून आणि जंगलाचा फायदा घेत कारचालक गाडी जागेवरच सोडून अंधारात फरार झाला. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता, त्यात अवैध विदेशी दारूचा साठा मिळून आला. या कारवाईत पोलिसांनी ३१ हजार १८५ रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूच्या १३१ बाटल्या आणि २ लाख ५० हजार रुपये किमतीची चारचाकी कार, असा एकूण २ लाख ८१ हजार १८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर यशस्वी कारवाई चिचगड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर, पोलीस हवालदार राऊत आणि पोलीस कर्मचारी मरस्कोल्हे यांच्या पथकाने केली असून फरार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *