LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

नव्या शैक्षणिक धोरणानुसार नवी पाठ्यपुस्तके

बालभारतीचे परिपत्रक जारी
इयत्ता २, ३, ५ आणि ८ वीसाठी होणार अंमलबजावणी
गोंदिया :
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी करत राज्यातील शाळा, पुस्तक विक्रेते व पालकांचे लक्ष वेधले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नव्या अभ्यासक्रमावर आधारित इयत्ता २ री, ३ री, ५ वी आणि ८ वीची नवीन पाठ्यपुस्तके आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या हाती येणार आहेत.
परिपत्रक निर्गमित करताना बालभारतीने स्पष्ट केले आहे की, इयत्ता ५ वी, ७ वी, ९ वी व ११ वीच्या विद्यमान पाठ्यपुस्तकांचा वापर २०२६-२७ हे अखेरचे वर्ष राहणार आहे. त्यामुळे शाळांनी आवश्यकतेनुसारच पुस्तकांची खरेदी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, इयत्ता २ री, ३ री, ४ थी व ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमात ‘शिकू मराठी आनंदाने’ हे पुस्तक उपलब्ध होणार असून हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, सिंधी, तेलुगू, तमिळ आणि बंगाली माध्यमांसाठीही मराठी विषयाची पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
इयत्ता ५ वीसाठी हिंदी सुलभभारती व हिंदी युगभारती, तसेच उर्दू, कन्नड, तामिळ, तेलुगू, सिंधी आणि बंगाली माध्यमांतील विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाचे पर्यायी पाठ्यपुस्तक प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती परिपत्रकातून देण्यात आली आहे. दरम्यान, इयत्ता ५ वी, ७ वी आणि ८ वीच्या एकांकिक व नियमित पाठ्यपुस्तकांमधील आशय व मूल्यमापन योजना समान ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम समजणे अधिक सुलभ होणार आहे.
‘कार्यपुस्तिका’ व ‘प्रात्यक्षिक नोंदवही’ वापरण्याबाबत शाळांनी याबाबत योग्य नियोजन करावे, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे. याशिवाय, महाराष्ट्रातील अनुभवी शिक्षकांनी तयार केलेल्या ‘स्वाध्याय पुस्तिका’ विद्यार्थ्यांसाठी कमी दरात उपलब्ध करून देण्यात येणार असून त्या बाजारभावापेक्षा सुमारे ४० टक्के सवलतीत मिळणार आहेत.
………………
लक्ष आता नव्या अभ्यासक्रमाकडे
बालभारतीच्या या निर्णयामुळे राज्यातील शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत असून, विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांचे लक्ष आता नव्या अभ्यासक्रमाकडे लागले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *