पुस्तकांसाठी विशिष्ट दुकानांची सक्ती केल्यास कारवाई
शाळांच्या दुकानदारीला लागणार लगाम
शिक्षण विभागाची कठोर भूमिका
गोंदिया : सीबीएसई शाळांचे नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले असून बाजारपेठेत शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांची लगबग पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे अनेक खाजगी शाळांनी पालकांना विशिष्ट दुकानातूनच महागडी पुस्तके वह्या आणि गणवेश घेण्याची सक्ती केल्याने पालकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. खाजगी शाळाकडून पालकांची होणारी आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी शिक्षण विभागाने कठोर भूमिका घेतली असून गणवेश व शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्यास शक्ती करणार्या शाळांवर थेट मान्यता रद्द करण्यापर्यंत कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
खासगी इंग्रजी शाळांकडून नवनवे फंडे वापरून विद्यार्थी पालकांची लूट केली जाते. शाळांकडून ठरविलेल्या दुकानाचा पत्ता देवून त्या ठिकाणाहूनच गणवेश, पुस्तक, वह्या आदी साहित्य खरेदी करण्याचे पालकांना सांगितले जाते. या संदर्भात पालकांना विशिष्ट दुकानांचा पत्ता देवून तेथूनच पूर्ण सेट खरेदी करण्याच्या तोंडी सूचना केल्या आहेत. शाळेने दिलेल्या यादीनुसार साहित्य इतर दुकानात उपलब्ध नसल्याने पालकांना न्यायला जास्त ठराविक दुकानातूनच खरेदी करावी लागत आहे. सीबीएसई शाळांनी एनसीईआरटी आणि राज्य मंडळाच्या शाळांनी एनसीईआरटीद्वारे प्रमाणित केलेली पुस्तके वापरणे बंधनकारक आहे. मात्र काही खाजगी प्रकाशनांची महागडी पुस्तके घेण्यास सांगून पालकांवर आर्थिक बोजा टाकला जात आहे. शाळांनी ठरलेल्या दुकानांमध्ये साहित्याचे दर बाजारभावापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. जो गणवेश किंवा वह्यांचा संच बाहेर कमी किमतीत मिळू शकतो. त्यासाठी पालकांना दुप्पट पैसे मोजावे लागतात. यातून पालकांची लूट होत असून आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. यासंदर्भात अनेक तक्रारीही करण्यात आल्या असून शिक्षण विभागाने दखल घेतली आहे. त्यानुसार पुस्तक, गणवेशासाठी विशिष्ट शाळांची सक्ती करणे शाळांच्या अंगलट येणार आहे. असा प्रकार दिसून आल्यास थेट कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे आगामी काळात शाळा व शिक्षण विभागाच्या कृतीकडे पालकांचे लक्ष राहणार आहे.
…………………
सरकारचा नियम काय म्हणतो…
कोणतीही शाळा पालकांना ठराविक दुकानातून गणवेश पुस्तके किंवा इतर शैक्षणिक साहित्य घेण्याची शक्ती करू शकत नाही. पालकांना त्यांच्या सोयीनुसार आणि परवडेल अशा ठिकाणाहून साहित्य घेण्याची पूर्ण मुभा आहे. शालेय साहित्य व गणवेश खरेदी बाबत शाळा कडून सक्ती केली जात असेल तर पालकांनी लेखी तक्रारी कराव्यात, असे आवाहन शिक्षण विभागाने पालकांना केले आहे.
………………
तर कारवाई; शिक्षण विभागाचे परिपत्रक
शाळेने दुकानाची सक्ती केल्याचे आढळले तर दंडात्मक कारवाई किंवा मान्यता रद्द करण्यापर्यंतचे पाऊल उचलले कर जाऊ शकते, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
कुठे करावी तक्रार जोर कोणत्याही पालकाला शाळेकडून अशा प्रकारे सक्ती केली जात असेल तर त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करता येते.
टक्केवारीचे गणित शासनाची पुस्तके न वापरता खाजगी प्रकाशनाच्या पुस्तकाना शाळा व्यवस्थापन प्राधान्य देते त्या मोबदल्यात प्रकाशनासोबत टक्केवारीचे गणित मांडले जाते.
००००००००००००००००

