LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

‘प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत’ महाराष्ट्राची गगनभरारी

सौरऊर्जेत देशपातळीवर प्रथम क्रमांक
गोंदिया :
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’च्या अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्याने देदीप्यमान यश संपादन केले असून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. १ ऑक्टोबर २०२५ ते २७ फेब्रुवारी २०२६ या पाच महिन्यांच्या कालावधीत राज्यात १ लाख ८ हजार ३२७ घरांवर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
घरगुती ग्राहकांचे दरमहा ३०० युनिटपर्यंतचे वीजबिल शून्य करणे आणि अतिरिक्त वीज निर्मितीतून त्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या या लोककल्याणकारी योजनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष भर देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या होत्या. केंद्र सरकारने गेल्या पाच महिन्यांतील कामगिरीचा आढावा घेतला असता, महाराष्ट्र राज्य १ लाख ८ हजार ३२७ सौर प्रकल्पांसह आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या यादीत ९५ हजार ६६५ प्रकल्पांसह उत्तर प्रदेश दुसर्‍या, तर ९४ हजार ३६४ प्रकल्पांसह गुजरात तिसर्‍या स्थानावर आहे. राजस्थान आणि केरळ या राज्यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळवला आहे.
विशेष म्हणजे, या कालावधीत संपूर्ण देशात एकूण ५ लाख ५७ हजार २२४ घरगुती ग्राहकांकडे सौर प्रकल्प बसवण्यात आले, ज्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा तब्बल १९ टक्के इतका मोठा आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणार्‍या भरीव अनुदानामुळे सर्वसामान्य ग्राहकांना अत्यल्प गुंतवणूक करून स्वतःची वीज निर्मिती करणे शक्य झाले आहे. महावितरणने प्रभावी नियोजन आणि तांत्रिक सुलभता आणल्यामुळेच राज्याला हे यश मिळवता आले असून, यामुळे महाराष्ट्रातील लाखो घरांचे वीजबिल आता कायमचे शून्य होण्याच्या मार्गावर आहे.
…………
कमी खर्चात मोफत वीज
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी माहिती दिली की, केंद्र आणि राज्य सरकारच्या भरीव अनुदानामुळे ग्राहकांना अत्यंत अल्प हिस्सा भरून हा प्रकल्प बसवता येत आहे. देशपातळीवर या पाच महिन्यांत एकूण ५ लाख ५७ हजार २२४ प्रकल्प बसवण्यात आले असून, त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *