LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

शहरात महावितरणचा ‘लो-व्होल्टेज ड्रामा’, आठवडाभरापासून समस्या

लक्ष देण्यास कर्मचार्‍यांची टाळाटाळ
गोंदिया :
शहरात महावितरणच्या भोंगळ कारभाराने नागरिकांना त्रस्त करून सोडले आहेत. त्यातच उष्णता वाढताच विजेची मागणी वाढली आहे. परंतु, महावितरण कंपनीच्या नार्केतपणामुळे विजेसंबधीत समस्या निर्माण होत आहेत. अशातच शहरातील अनेक भागात मागील तीन ते चार दिवसांपासून विजेच्या कमी दाबामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. विजेच्या कमी व्होल्टेजमुळे पंखे, कुलर काम करीत नसून नागरिकांना रात्र जागून काढावी लागत आहे. वारंवार तक्रार करूनही साधी सहनिशा करण्याचे औदार्य महावितरणकडून दाखविण्यात आले नाही. यामुळे घराघरातील विज उपकरण निकामी होण्याची वेळ आली आहे. या प्रकाराकडे केव्हा लक्ष देणार, असा प्रश्न परिसरातील नागरिक करीत आहेत.
मागील तीन ते चार दिवसांपासून शहरासह जिल्ह्याच्या तापमानात एकाकी वाढ झाली आहे. तापमानाचा पारा ४२ अंशावर गेला असून अचानक वाढलेल्या उष्णतेने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. गारवा मिळावा, यासाठी वातानुकूलित उपकरणांचा वापर वाढल्याने आपोआप विजेची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत महावितरण कंपनीकडून पुरेशी व्यवस्था करणे अपेक्षित होते. परंतु, तापमानात वाढ होताच महावितरणचा पारा घसरणे सुरू झाले आहे. विजे संबधित समस्या निर्माण झाल्याने शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. त्यातल्यात्यात तक्रार करूनही कर्मचारी व्यस्त असल्याचे सांगून साधी दखल घेतली जात नाही. विज वापर वाढल्याने समस्या निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र उपाययोजना काय सुरू आहे, याचे उत्तर दिले जात नाही. त्यातच शहरातील अनेक भागात मागील तीन ते चार दिवसांपासून रात्रीला व्होल्टेज समस्या निर्माण होत आहे. या प्रकाराची तक्रार महावितरण कार्यालयात करण्यात आली. संबधित कर्मचार्‍यांची तक्रार नोंद केल्याचेही सांगितले. परंतु, तपासणी करण्यास कर्मचारी पोहोचलेच नाही. कमी व्होल्टेज राहत असल्याने घराघरातील उपकरणांवर परिणाम होत आहे. तर कुलर, पंखे काम करीत नसल्याने नागरिकांना रात्र जागरणाची वेळ आली आहे. महागडे साहित्य निकामी होत असल्याने त्याची भरपाई महावितरण देणार का? असा प्रश्न आता संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकाराकडे लक्ष देवून समस्या मार्गी लावावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
………………..
कार्यक्रमाचे आयोजन अन् कमी दाबाची समस्या
विशेष म्हणजे, व्होल्टेज नसल्याची तक्रार करण्याकरीता महावितरण कार्यालयात फोन केले असता. संबधित कर्मचार्‍याने तक्रार नोंदवून कार्यक्रम आयोजन होत असल्याने विजेच्या कमी दाबाची समस्या निर्माण होत असल्याची बतावणी केली जात आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पहिल्यांदाच कार्यक्रम आयोजित होत आहेत का? यापुर्वी कार्यक्रम आयोजित झाले नव्हते का? असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे. एंकदरीत उडवाउडवीचे उत्तर देवून कामचुकारपणा करण्यासाठीच अशी उत्तरे दिले जात आहेत, अशीही चर्चा परिसरात आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *