LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

सिंदेवाहीत बिबट्याचा थरार: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; फावड्याच्या प्रहाराने पत्नीने पतीला खेचले मृत्यूच्या दाढेतून!

पळसगाव जाट येथे थरारक घटना; शेतकरी जखमी, वनविभागाच्या सुस्त कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप.
सिंदेवाही (चंद्रपूर):
तालुक्यातील पळसगाव जाट शिवारात रविवारी सकाळी वन्यप्राण्यांच्या दहशतीचा एक थरारक आणि अंगावर काटा आणणारा प्रकार समोर आला आहे. शेतात काम करत असताना दबा धरून बसलेल्या नरभक्षक बिबट्याने एका शेतकऱ्यावर थेट मानेचा वेध घेण्याच्या उद्देशाने झडप घातली. मात्र, ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ याचा प्रत्यय देत, सोबत असलेल्या पत्नीने रणरागिणीचे रूप धारण केले. हातात असलेल्या फावड्याने बिबट्यावर थेट प्रहार करत पतीचे प्राण वाचवले. पौर्णिमा गायकवाड असे या धाडसी महिलेचे नाव असून, त्यांच्या या अद्भूत शौर्यामुळे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे, तर दुसरीकडे वनविभागाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पळसगाव जाट येथील तलाठी साझा क्र. १६, गट क्र. ४७२ मधील स्मशानभूमी परिसरातील शेतात महेंद्र मेघश्याम गायकवाड (वय ४५) हे आपल्या पत्नी पौर्णिमा गायकवाड यांच्यासह नेहमीप्रमाणे शेतीची मशागत करत होते. पावसाळा तोंडावर असल्याने शेतीकामांची लगबग सुरू असतानाच, शेजारील दाट झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक महेंद्र गायकवाड यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. बिबट्याने झडप घालताच महेंद्र यांनी आरडाओरड केली. पतीला बिबट्याच्या जबड्यात पाहून सामान्यतः कुणाचीही गाळण उडाली असती. मात्र, पौर्णिमा गायकवाड यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने प्रसंगावधान राखले. त्यांनी आजूबाजूला न पाहता थेट हातातील फावडे उगारले आणि बिबट्याच्या दिशेने धाव घेत त्याच्यावर जोरदार वार केला. या अनपेक्षित आणि धाडसी प्रतिकारामुळे बिबट्या चक्रावला आणि त्याने काही पावले मागे घेतली.
दुसऱ्यांदा हल्ला केला, पण… नरभक्षक बिबट्याने पुन्हा एकदा महेंद्र यांच्यावर चाल करून येण्याचा प्रयत्न केला, परंतु पौर्णिमा डगमगल्या नाहीत. त्यांनी ढाल बनून बिबट्याला पुन्हा हुसकावून लावले आणि पतीला सुरक्षित बाजूला ओढले. पत्नीच्या या रौद्र रूपामुळे बिबट्याने अखेर जंगलाच्या दिशेने पळ काढला. या हल्ल्यात महेंद्र गायकवाड हे किरकोळ जखमी झाले असून, त्यांना तातडीने सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
…………………………………..
वनविभागाचा सुस्त कारभार; नागरिक आक्रमक!
या घटनेमुळे पळसगाव शिवारासह संपूर्ण सिंदेवाही तालुक्यात भीतीचे प्रचंड वातावरण पसरले आहे. शेतकरी आता शेतात जाण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. वनविभागाला वारंवार सूचना देऊनही वन्यप्राण्यांचा बंदोबस्त केला जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष आहे. वनविभागाने तात्काळ या नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा परिसरातील त्रस्त नागरिकांनी ‘देशोन्नती’शी बोलताना दिला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *