LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

महावितरणच्या भरारी पथकांचा वीजचोरांना दणका

विदर्भात वर्षभरात २,९३४ वीजचो-या उघडकीस; ४०२ जणांवर गुन्हे दाखल
नागपूर (Nagpur) :
ग्राहकांना २४ तास अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण कटिबद्ध असून, या प्रवासातील सर्वात मोठा अडथळा असलेल्या वीजचोरी विरोधात प्रशासनाने आता कंबर कसली आहे. वीज वितरण हानी कमी करून कंपनीचे आर्थिक आरोग्य सुधारण्यासाठी सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने गेल्या वर्षभरात धडाकेबाज मोहीम राबवत नागपूर प्रादेशिक विभागात (विदर्भात) ४७ कोटींच्या वीजचोरीचा पर्दाफाश केला आहे.
एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या आर्थिक वर्षात महावितरणच्या भरारी पथकांनी केलेल्या या नियोजनबद्ध कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले असून, प्रामाणिक ग्राहकांमधून या मोहिमेचे मोठे स्वागत होत आहे. महावितरणच्या आर्थिक संरचनेला खिळखिळी करणार्‍या वीजचोरीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी), मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर प्रादेशिक विभागात यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहे. नागपूर परिक्षेत्रात मंडळ स्तरावर १२ आणि विभागीय स्तरावर ३ अशी एकूण १५ विशेष भरारी पथके तैनात करण्यात आली असून नागपूर व अकोला येथील सुरक्षा व अंमलबजावणी परिमंडळ कार्यालयांच्या माध्यमातून या मोहिमेवर सूक्ष्म लक्ष ठेवले जात आहे.

या विशेष मोहिमेअंतर्गत गेल्या वर्षभरात विदर्भातील एकूण १० हजार ७०९ संशयास्पद वीज जोडण्यांची कसून तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या तपासणीत एकूण २ हजार ९३४ ग्राहकांकडे थेट वीजचोरी होत असल्याचे निष्पन्न झाले असून या दोषींविरुद्ध विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये कठोर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून तब्बल ३४ कोटी ५ लाख रुपयांची थेट वीजचोरी उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे तर, कलम १२६ आणि इतर १,०९२ प्रकरणांमध्ये १३ कोटी ४० लाख रुपयांच्या वीज वापरातील अनियमिततेवरही प्रशासनाने बोट ठेवले आहे. अशा प्रकारे एकूण ४७ कोटी ४६ लाख रुपयांचे निर्धारण करण्यात आले होते, त्यापैकी ४३ कोटी १४ लाख रुपयांची विक्रमी रक्कम संबंधित ग्राहकांकडून वसूल करण्यात महावितरणला यश आले आहे. ज्या ग्राहकांनी चोरीची रक्कम भरण्यास टाळाटाळ केली, अशा ४०२ जणांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये वीजचोरीचे फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वीजचोरी हा केवळ कायद्याने गुन्हा नसून तो एक सामाजिक अपराध आहे, कारण यामुळे होणार्‍या आर्थिक नुकसानीचा फटका पर्यायाने सर्वसामान्य आणि प्रामाणिक वीज ग्राहकांना सोसावा लागतो. ही गळती रोखण्यासाठी महावितरणने आता जनसहभागावर भर दिला असून आपल्या परिसरात कुठेही वीजचोरी होत असल्यास त्याची माहिती स्थानिक भरारी पथक किंवा जवळच्या महावितरण कार्यालयास देण्याचे आवाहन केले आहे. चोरीची अचूक माहिती देणार्‍या नागरिकास महावितरणतर्फे आकर्षक रोख बक्षीस दिले जाते आणि माहिती देणार्‍याचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवले जाते. व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, कार्यकारी संचालक सौ. अपर्णा गिते (भा.पो.से.) आणि उपसंचालक सुनील थापेकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवली जात असून सर्व अभियंते व कर्मचार्‍यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे वीजचोरीचे प्रमाण घटण्यास मदत होत आहे. ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा आणि महावितरणला सहकार्य करून जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन प्रशासनाने केले असून भविष्यात ही मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *