LatestNewsगोंदियागोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

वयाच्या ८० व्या वर्षी दिगंबर गंथडे यांची सुवर्ण भरारी

चंदीगड येथील नॅशनल मास्टर गेम्समध्ये एक सुवर्ण व दोन रौप्य पदकांची कमाई

अर्जुनी मोरगाव : जिद्द आणि चिकाटी असेल तर वय केवळ आकडा उरतो, हे अर्जुनी मोरगाव येथील ८० वर्षीय खेळाडू दिगंबर विश्वनाथ गंथडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. चंदीगड येथे नुकत्याच पार पडलेल्या ५ व्या खेलो मास्टर नॅशनल गेम्स २०२६ मध्ये त्यांनी आपल्या वयोगटात एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदके पटकावून महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. दिनांक २० ते २२ मार्च २०२६ दरम्यान पार पडलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी ८० पेक्षा जास्त वयोगटात आपले कौशल्य दाखवले.दिगंबर गंथडे यांनी २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत आणि लांब उडी या दोन्ही क्रीडा प्रकारांत त्यांनी द्वितीय क्रमांक मिळवत रौप्य पदकांवर आपली मोहोर उमटवली. त्यांच्या या नेत्रदीपक यशामुळे अर्जुनी मोरगावसह संपूर्ण गोंदिया जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे. वयाच्या या टप्प्यावरही त्यांचा उत्साह आणि फिटनेस तरुण खेळाडूंना लाजवणारा आहे.त्यांच्या या यशामागे त्यांच्या पत्नी सौ.जया दिगंबर गंथडे आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचे मोठे योगदान असून, त्यांनी दिलेल्या खंबीर पाठिंब्यामुळेच आपण हे यश संपादन करू शकलो, अशा भावना गंथडे यांनी व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रीय पातळीवरील या कामगिरीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

…………

राज्यस्तरीय स्पर्धेतही गंथडे यांचा डंका

शिर्डी (कोकमठाण) येथे आयोजित चौथ्या खेलो मास्टर गेम्स राज्यस्तरीय चॅम्पियनशिपमध्ये दिगंबर गंथडे यांनी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली. ८० वर्षे व त्यावरील वयोगटातील खेळाडूंसाठी आयोजित या कठीण स्पर्धेत त्यांनी १०० मीटर धावणे प्रकारात प्रथम क्रमांक, २०० मीटर धावणे प्रकारात प्रथम क्रमांक आणि लाँग जंपमध्ये द्वितीय क्रमांक पटकावत दोन सुवर्णपदके व एक रौप्यपदक आपल्या नावावर केले होते. या कामगिरीची दखल घेवूनच त्याची राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड झाली होती. त्यातही त्यांनी गोंदिया जिल्ह्याचे नाव कोरले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *