कालळाचा घाला: लग्नाला जाणाऱ्या बहीण-भावाचा भीषण अपघातात मृत्यू
नवेगाव/बांध जवळील घटना; आई गंभीर जखमी, देवरी तालुक्यावर शोककळा
अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : नातेवाईकाच्या लग्नासाठी आनंदाने निघालेल्या एका कुटुंबावर काळाने भीषण घाला घातला आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव/बांध येथे शनिवारी संध्याकाळी ६:३० वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात देवरी येथील सख्ख्या चुलत बहीण-भावाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवरील आई गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर गोंदिया येथे उपचार सुरू आहेत.अंकुर अरुण शहारे (वय १८, रा. देवरी) आणि रितिका संजय जांभुळकर (वय १०, रा. चारभाटा/बोरगाव) अशी मृतांची नावे आहेत. तर अरुणा अरुण शहारे (वय ५०, रा. देवरी) असे जखमी मातेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवरी येथील वॉर्ड क्र. १४ मध्ये राहणारे शहारे कुटुंब अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे येथे आयोजित एका विवाह सोहळ्यासाठी दुचाकीने (क्र. उपलब्ध नाही) जात होते. नवेगाव/बांध परिसरात पोहचले असता, मागून येणाऱ्या एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले. दुर्दैवाने, अंकुर आणि रितिका यांच्या शरीरावरून वाहनाचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.कुटुंबावर दुःखाचा डोंगर मृतक रितिका ही देवरी येथेच चौथ्या वर्गात शिकत होती. कोरोनाच्या काळात रितिकाच्या वडिलांचे निधन झाले होते, तेव्हापासून ती शहारे कुटुंबाकडेच राहत होती. घरची संपूर्ण जबाबदारी अरुणा शहारे यांच्या खांद्यावर होती. एकाच वेळी घरातील दोन तरुण मुलांचा मृत्यू झाल्याने शहारे कुटुंबासह संपूर्ण देवरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आणि प्रवाशांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमी अरुणा शहारे यांना तातडीने रुग्णवाहिकेने गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून, धडक देऊन पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत.

