LatestNewsगोंदिया- भंडारा

‘फटाका’ सायलेन्सर लावणाऱ्या दुचाकींवर पोलिसांचा दणका! गोंदिया शहरात ५ वाहने जप्त; ट्रॅफिक पोलिसांची कडक कारवाई

ध्वनी प्रदूषणाने नागरिक त्रस्त; मॉडीफाईड सायलेन्सर लावल्यास गाड्या होणार डिटेन, पोलीस अधीक्षकांचा इशारा
गोंदिया :
गोंदिया शहरात दुचाकींमध्ये मॉडीफाईड (सुधारित) व फटाक्यांसारखा प्रचंड आवाज करणारे सायलेन्सर लावून बेधडक वाहने चालवणाऱ्यांवर जिल्हा वाहतूक शाखेने गुरुवारी, ४ सप्टेंबर रोजी जोरदार कारवाई केली. पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या या धडक मोहिमेत अशा ५ दुचाकींवर कारवाई करत त्यांना वाहतूक शाखेत जप्त (डिटेन) करण्यात आले आहे.

गोंदिया शहरात फटाका सायलेन्सर लावून दुचाकी चालवणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. या वाहनांच्या कर्णकर्कश आवाजामुळे लहान मुले, वृद्ध, रुग्ण व सामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. याबाबतच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी कारवाईचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने जिल्हा वाहतूक शाखेच्या पथकाने गोंदिया शहरात विशेष मोहीम राबवून ही कारवाई केली.
ही कारवाई जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी नागेश भास्कर यांच्या नेतृत्वाखाली श्रेणी पोलीस निरीक्षक श्रावणेडाम, छत्रपालसिंग चंदेल, पोहवा जफरअली सय्यद, गणेश काकडे, अमित मुझारीया, आनंद बावणथडे, गणेश लिल्हारे, प्रेमलाल ताराम, पोशि मनिष मारवाडे, जयराम मंजरटे, अरविंद तावाडे, विवेक कटरे, प्रविण वाढिवे, उमेश गजभिये, चापोशि विनोद हरणखेडे आणि विक्की दगडे यांच्या पथकाने केली.
नियम मोडल्यास थेट गाडी होणार जप्त!
यापुढील काळातही ज्या दुचाकींमध्ये मॉडीफाईड सायलेन्सर किंवा फटाका सायलेन्सर आढळल्यास त्यांच्यावर अधिक प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि वाहने थेट जप्त (डिटेन) केली जातील, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन:
दुचाकींमध्ये मॉडीफाईड सायलेन्सर लावून फटाक्यांसारखा मोठा आवाज केल्यास नागरिकांना, विशेषतः आजारी व्यक्तींना मानसिक व शारीरिक त्रास होतो. त्यामुळे दुचाकी चालकांनी अशा प्रकारचे बेकायदेशीर सायलेन्सर वापरू नयेत आणि वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन गोंदिया पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *