गिरगाव येथे वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू; हरवलेली शेळी शोधायला गेला होता जंगलात
नागभीड (चंद्रपूर) : नागभीड तालुक्यातील गिरगाव येथील एका ५२ वर्षीय गुराख्याचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आत्माराम बोरकर (वय ५२ वर्षे, रा. गिरगाव) असे मृत गुराख्याचे नाव आहे. जंगलातून चरून परत न आलेल्या आपल्या एका शेळीचा शोध घेण्यासाठी ते पुन्हा जंगलात गेले असता, वाघाने त्यांच्यावर झडप घालून त्यांना ठार केले. ही घटना गुरुवार, १८ जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडली असून शुक्रवार, १९ जून रोजी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला.
माहितीनुसार, आत्माराम बोरकर हे नेहमीप्रमाणे गुरुवारी आपल्या शेळ्या चारण्यासाठी गिरगाव जवळील कक्ष क्रमांक ५३५ च्या जंगलात गेले होते. संध्याकाळी सर्व शेळ्या सुखरूप घरी परतल्या, मात्र त्यापैकी एक शेळी कमी असल्याचे आत्माराम यांच्या लक्षात आले. त्या हरवलेल्या शेळीचा शोध घेण्यासाठी ते सायंकाळच्या सुमारास पुन्हा जंगलाच्या दिशेने गेले, मात्र उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. यामुळे काळजीत पडलेल्या कुटुंबीयांनी रात्रभर त्यांचा शोध घेतला, पण काहीही पत्ता लागला नाही.
शुक्रवारी सकाळी गावातील नागरिक आणि कुटुंबीयांनी गिरगाव नियतक्षेत्र ५३५ च्या जंगलात पुन्हा शोधमोहीम हाती घेतली. दरम्यान, जंगलात आत्माराम बोरकर यांचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. वाघाच्या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
वनविभाग व पोलिसांकडून पंचनामा घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक आणि स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक वनसंरक्षक महेश गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी ए.आर. कन्नामवार, क्षेत्र सहाय्यक हिंगणकर, वनरक्षक मेकेवाड आणि तळोधीचे ठाणेदार राहुल गुहे यांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. वनविभागाचे नागरिकांना आवाहन या घटनेमुळे गिरगाव आणि परिसरातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. परिसरात वाघाचा वावर असल्याने वनविभागाने नागरिकांना जंगलात न जाण्याचे व सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, एखादे पाळीव जनावर वाघाच्या हल्ल्यात मारले गेले किंवा बेपत्ता झाले, तर नागरिकांनी स्वतः जंगलात जाऊन शोध घेण्याऐवजी तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, अशी सूचना वनविभागाच्या वतीने करण्यात आली आहे.


