अजितदादा पवारांच्या कार्याचा धडा अभ्यासक्रमात समाविष्ट करा; आमदार राजकुमार बडोले यांची विधानसभेत आग्रही मागणी
मुंबई/गोंदिया: अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध जनहितार्थ मुद्द्यांवर आपली आक्रमक भूमिका मांडली. सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी शेतकरी, शिक्षण आणि सामाजिक न्याय क्षेत्रातील सकारात्मक विकासासाठी सरकारला महत्त्वपूर्ण रचनात्मक सुझाव दिले.आमदार बडोले यांनी शालेय शिक्षण अभ्यासक्रमात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्य आणि प्रेरणादायी जीवनावर आधारित एक धडा समाविष्ट करण्याची मागणी केली. यामुळे विद्यार्थ्यांना नेतृत्व, विकास आणि समर्पणाची प्रेरणा मिळेल, असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना आमदार बडोले यांनी सध्याच्या ८ तासांऐवजी १२ तास वीज पुरवठा करण्याची मागणी लावून धरली. मुबलक पाणी उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. यासोबतच गोंदिया जिल्ह्यात १० लाख क्विंटल धान अद्याप शासनाने उचलले नसून लिमिट अभावी ही प्रक्रिया अडकल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. धान खरेदीची लिमिट तातडीने वाढवून शेतकऱ्यांना पूर्ण न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.सामाजिक न्याय विषयावर बोलताना त्यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत सरकारचे लक्ष वेधले. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार उपवर्गीकरणाचा कायदा केल्याचे आणि राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केल्याचे त्यांनी स्वागत केले. मात्र, या उपवर्गीकरणात ५९ जातींना पूर्ण न्याय मिळावा यासाठी ते वस्तुनिष्ठ व सांख्यिकी डेटाच्या आधारे व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. १९३० नंतर जातीगत जनगणना झाली नसल्याने, सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनुसार मनमानी पद्धत टाळून डेटाबेस्ड उपवर्गीकरण करावे, असे आवाहन आमदार राजकुमार बडोले यांनी यावेळी केले.

