Deori police: देवरी पोलीस ठाणे हद्दीत शेळ्या चोरांचा धुमाकूळ
पशुपालक चिंतेत: बंदोबस्त करण्याची मागणी
देवरी : देवरी पोलिस ठाणे अंतर्गत पशुपालन करणाऱ्यामध्ये भीती निर्माण झाली आहे. लोहारा बिट परिसरात मागील दोन दिवसापासून बकऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस बकऱ्या चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने पशुपालक त्रस्त झाले आहे. 15 ऑगस्टच्या रात्री अंदाजे एक ते दोन वाजेदरम्यान अज्ञात चोरांनी टेकाबेदर, सुबरायटोला, चारभाटा तसेच डोंगरगाव परिसरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत बकऱ्या चोरून नेल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या बकऱ्या चोरांचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, टेकाबेदर निवासी विष्णू मोतीराम घासले या शेतकऱ्याच्या दोन शेळ्या अंदाजे 15 हजार किमतीच्या, सुबरायटोला निवासी किशोर बोरकर यांच्या दोन शेळ्या, चारभाटा निवासी हरिदास तरोने या शेतकऱ्याच्या तीन शेळ्या तर डोंगरगाव गावातील शेळ्यांची चोरी झाली असून बकऱ्या चोरांच्या मुस्क्या आवळण्यची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. चोरटे कुठल्याही वाहनाचा नंबर टाकून ती नंबरप्लेट दुचाकी, कारला लावून अशा पद्धतीने शेळ्या, रस्त्याच्या कडेलगत असलेली जनावरे तसेच रात्रीच्या अंधाराचा फायदा उचलत चोरी करत असल्याने शेतकरीवर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे. मागील दोन दिवसापासून देवरी पोलीस स्टेशन अंतर्गत लोहारा बीट परिसरातील अनेक गावांमधून बकऱ्या चोरीला जाण्याचे सत्र सुरुच आहे. पोलिसांनी या बकऱ्या चोरांचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी परिसरातील शेतकरीवर्गातून होत आहे.

