LatestNewsगोंदियाविदर्भ

गोंदियात खळबळ; शासकीय नर्सिंग कॉलेजच्या ३५ विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा

मेडिकलमध्ये उपचार सुरू

गोंदिया : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत (केटीएस) येणाऱ्या शासकीय नर्सिंग कॉलेजमध्ये गुरुवारी सकाळी एक खळबळजनक घटना उघडकीस आली असून, कॉलेजच्या कॅन्टीनमधील जेवणातून तब्बल ३५ प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींना विषबाधा झाली आहे. या सर्व विद्यार्थिनींना तातडीने उपचारासाठी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या आवारात शासकीय नर्सिंग कॉलेज असून येथे एकूण १८५ विद्यार्थिनी निवासी राहून नर्सिंगचे प्रशिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थिनींना कॉलेजच्या कॅन्टीनमधून जेवण आणि नाश्ता दिला जातो. बुधवारी रात्री सर्व विद्यार्थिनींनी कॅन्टीनमध्ये जेवण केले आणि त्या झोपी गेल्या. मात्र, मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास दोन ते तीन विद्यार्थिनींना अचानक पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले. परंतु, गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हा त्रास इतर विद्यार्थिनींनाही जाणवू लागला आणि बाधित विद्यार्थिनींची संख्या ३५ वर पोहोचली. यामुळे कॉलेज प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. तातडीने रुग्णवाहिका बोलावून सर्व ३५ विद्यार्थिनींना गोंदिया मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले.बाधित विद्यार्थिनींमध्ये प्रामुख्याने आरती चौधरी, प्रांजली डोंगरवार, कुशिका बोपचे, स्नेहा उईके, त्रिवेणी पवार, रिमा दहागावकर, मोहिनी सोनवाने, डॉली सूर्यवंशी, सलोनी दमाहे, रिया डोंगरे, त्रिशा सेलोकर, सलोनी जनबंधू, मयुरी भेंडारकर, चंदा टेकाम, पायल फुंडे, सोनाली देवधनी, कृशाली भगत, रजनी रहांगडाले, श्वेता डोंगरे, कोमल भावे, दीपा दहीकर व इतरांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) पथक कॉलेजमध्ये दाखल झाले असून, त्यांनी कॅन्टीनमधील अन्नाचे आणि पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. १८५ पैकी ३५ विद्यार्थिनींनाच हा त्रास झाल्याने विषबाधेचे नेमके कारण काय, याचा शोध आता आरोग्य विभाग घेत आहे. दरम्यान, सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *