गोंदियात मिलन लॉनमध्ये ‘बिहार दिन’ उत्साहात साजरा
बिहार रेल परिवारातर्फे भव्य सोहळा : २०१२ पासूनची सांस्कृतिक परंपरा यावर्षीही कायम
गोंदिया (प्रतिनिधी) : बंगाल प्रांतापासून वेगळे होऊन स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आलेल्या बिहारचा स्थापना दिवस गोंदियामध्ये अत्यंत उत्साहात आणि हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. ‘बिहार रेल परिवार गोंदिया’ यांच्या वतीने स्थानिक मिलन लॉन येथे आयोजित या सोहळ्यात हजारोच्या जनसमुदायाने उपस्थिती लावून बिहारच्या गौरवशाली परंपरेचा जागर केला.सन २०१२ पासून गोंदियात बिहार रेल परिवाराच्या वतीने प्रतिवर्षी हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. यावर्षीच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जे. एन. तिवारी (अशुशर), आनंद भरत (ACM) आणि एडीएम (अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी) प्रामुख्याने उपस्थित होते.

मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. आपल्या ओजस्वी भाषणातून अतिथींनी बिहारचा ऐतिहासिक वारसा, तिथली समृद्ध संस्कृती आणि देशाच्या जडणघडणीत बिहारच्या जनतेचे असलेले मोलाचे योगदान यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बिहारच्या मातीतील लोककला, पारंपरिक संगीत आणि नृत्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. हजारोंच्या संख्येने जमलेल्या नागरिकांमुळे संपूर्ण मिलन लॉन परिसर बिहारच्या सांस्कृतिक रंगात न्हाऊन निघाला होता.हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी बिहार रेल परिवार गोंदियाच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. यामध्ये प्रामुख्याने अध्यक्ष राजेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली हिमांशु शेखर, डी. एन. सिन्हा, मनोज कुमार, राकेश कुमार, नंदलाल, विनोद कुमार, अशोक कुमार, डी. के. सिंग, धीरज कुमार, प्रमोद, मनोरंजन कुमार, संजय कुमार, दी कुमार, आशुतोष पांडेय, राजेश कुमार, भारत भूषण आणि इतर सहकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. या कार्यक्रमातून गोंदियातील बिहार बांधवांची एकजुटता आणि आपल्या मूळ संस्कृतीप्रती असलेले प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

