मोहगाव बुज येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न
जागतिक जल दिनानिमित्त आयोजन
गोंदिया : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा न्यायालय, गोंदिया तसेच ग्रामपंचायत मोहगाव बुज यांच्या संयुक्त विद्यमाने २२ मार्च २०२६ रोजी ‘जागतिक जल दिन’ निमित्त विशेष कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मोहगाव बुज येथील ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी ११ वाजता आयोजित या कार्यक्रमात जिल्हा व सत्र न्यायालयाच्या वकील अॅड. कांचन ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जागतिक जल दिनाचे महत्त्व विशद केले. त्यांनी प्रदूषणमुक्त पाणी आणि हवा मिळणे हा नागरिकांचा अधिकार असल्याचे सांगून नॅशनल लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीच्या (NALSA) ‘जागृती’ आणि ‘डॉन’ (२०२५) या नवीन योजनांची तसेच सार्वजनिक उपयुक्तता शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पॅनल लॉयर अॅड. एकता गणवीर यांनी जलसंधारण आणि ‘वॉटर हार्वेस्टिंग’ काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. तसेच त्यांनी महिलांचे घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायदा (२००५), पोक्सो कायदा (२०१२), हुंडा प्रतिबंधक कायदा (१९६१) आणि ‘नाल्सा संवाद’ (२०२५) योजनेअंतर्गत अन्न व शिक्षणाच्या अधिकारावर प्रकाश टाकला. याप्रसंगी ग्रामपंचायत मोहगावचे उपसरपंच श्री. कमलेश रहांगडाले, इंडियन सोशल वेल्फेअर सोसायटीचे जिल्हा समन्वयक श्री. ज्ञानेश्वर पहले, रेखाबाई पटले यांच्यासह जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी व पी.एल.व्ही. प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच कमलेश रहांगडाले यांनी केले तर आभार प्रदर्शन रेखाबाई पटले यांनी मानले. या जनजागृती कार्यक्रमात गावातील ५० ते ६० नागरिकांनी सहभाग घेतला असून, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

