LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

गोंदिया जिल्ह्यात मुलींसाठी ‘एचपीव्ही’ लसीकरण

मोहीम गर्भाशय मुखाच्या कॅन्सरपासून संरक्षणासाठी प्रशासनाचा पुढाकार

गोंदिया : गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींसाठी ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची बैठक जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी माहिती देताना सांगितले की, ज्या मुलींचे वय 14 वर्ष पूर्ण झाले असून 15 वर्ष पूर्ण होण्याच्या आत आहे, अशा मुलींना ‘एचपीव्ही’ लस देण्यात येणार आहे. या लसीकरणामुळे भविष्यात गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत यांनी ‘एचपीव्ही’ लसीकरणाबाबत सादरीकरण करत या लसीचे महत्त्व आणि गरज स्पष्ट केली.

जागतिक आरोग्य संघटनेने 2030 पर्यंत एचपीव्ही लसीकरण पूर्ण करून पुढील काळात गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरवर नियंत्रण मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी सांगितले की, एचपीव्ही लसीकरण हे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी अत्यंत प्रभावी व सुरक्षित आहे. त्यामुळे पालकांनी कोणतीही भीती न बाळगता आपल्या मुलींना लसीकरण करून घ्यावे. यामुळे मुलींचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मोठी मदत होईल. तसेच ग्रामीण व शहरी भागात या मोहिमेबाबत व्यापक जनजागृती करण्याचे निर्देशही त्यांनी आरोग्य विभागाला दिले.या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पवन राऊत, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती जयस्वाल तसेच विविध विभागांचे अधिकारी, वैद्यकीय तज्ञ आणि प्रतिनिधी उपस्थित होते.आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, एचपीव्ही (Human Papilloma Virus) हा संसर्ग गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचा प्रमुख कारण मानला जातो. एचपीव्ही लसीकरणामुळे या विषाणूचा प्रसार रोखता येतो आणि भविष्यात कर्करोगाचा धोका कमी करता येतो.भारतामध्ये महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने एचपीव्ही लसीकरणाला विशेष महत्त्व दिले आहे. 9 ते 14 वर्ष वयोगटात ही लस घेणे सर्वाधिक प्रभावी मानले जाते. केंद्र शासनामार्फत 14 ते 15 वर्षांपर्यंतच्या मुलींसाठी ही मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आरोग्य विभागाने पालकांना आवाहन केले आहे की, मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने ‘एचपीव्ही’ लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असून या मोहिमेला सहकार्य करून मुलींना वेळेत लस देण्यास पुढाकार घ्यावा. असे आवाहन केले जात आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *