LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

एसटी चालक-वाहकांसाठी अल्कोटेस्ट तपासणी सक्तीची; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कठोर निर्णय

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सेवेत असताना मद्यपानाला आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी एसटी प्रशासनाने कठोर उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आगारात कामावर हजर होणाऱ्या सर्व चालकांची अल्कोटेस्ट मशीनद्वारे दररोज मद्यपान तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तपासणीची योग्य नोंद घेतल्यानंतरच चालकांना कर्तव्यावर पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
२५ जानेवारी २०२६ रोजी सरनाईक यांनी परळ बसस्थानकाला भेट दिली असता काही धक्कादायक प्रकार आढळून आले. या घटनेची गंभीर दखल घेत त्यांनी तातडीने चौकशी समिती नेमून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तसेच या प्रकारास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले होते.


यानुसार एसटी प्रशासनाने तीन अधिकाऱ्यांची समिती नेमून या प्रकरणाची तपासणी केली. चौकशीदरम्यान दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजनाही सुचविण्यात आल्या आहेत. हा अहवाल एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना सादर करण्यात आला असून त्यांच्या निर्देशानुसार दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. नव्या उपाययोजनांनुसार आगारात कामावर हजर होणाऱ्या चालकांची वाहन परीक्षकांमार्फत नियमित तपासणी केली जाणार आहे. तसेच वाहकांना ड्युटी देण्यापूर्वी त्यांचीही अल्कोटेस्ट मशीनद्वारे तपासणी करून त्याची नोंद ठेवणे बंधनकारक राहणार आहे. तपासणी प्रक्रिया योग्यरीत्या पार पडते की नाही यावर सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, सहाय्यक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक आणि वाहतूक नियंत्रक यांनी देखरेख ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
……………………………………
जनजागृतीसाठी विशेष प्रशिक्षण
एसटी कर्मचाऱ्यांमध्ये मद्यपानाबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मद्यपानाचे दुष्परिणाम याबाबत प्रबोधन केले जाणार आहे. यासाठी आगारांमध्ये ‘मद्यपान जनजागृती सप्ताह’ आयोजित केला जाणार असून चालक-वाहक व इतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल. तसेच मुख्य बसस्थानक, चालक-वाहक विश्रांतीगृहे आणि ज्या आगारांमध्ये चालक-वाहक जास्त प्रमाणात थांबतात अशा ठिकाणी मद्यपानास प्रतिबंध करण्यासाठी विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच लाइट-पंखे यांसारख्या मूलभूत सुविधांची देखभाल करण्याची जबाबदारीही संबंधित अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. या उपाययोजनांमुळे एसटी सेवेतील शिस्त वाढून प्रवाशांच्या सुरक्षिततेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास एसटी प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *