त्या रोजगार सेवकावर कारवाई होणार का? रोहयोच्या कामावर बोगस मजूर?
सडक अर्जुनी : तालुक्यातील गट ग्रामपंचायत मुरपार/लेंडेझरी अंतर्गत म.ग्रा.रो.ह.योजनेच्या कामाच्या हजेरी पत्रकावर गावातील दोन व्यक्तींची बोगस नावे टाकून पैशाची उचल केल्याचा प्रकार ग्रा.प.सदस्य अरुण वासनिक यांनी उघडकीस आणला. या प्रकरणाची माहिती अधिकारात खंडविकास अधिकारी यांना माहिती मागितली असता मस्टर क्रमांक १०६०७ यावर गावातील दोन व्यक्तींची बोगस नावे दिसली. त्यामुळे रोजगार हमी योजनेच्या नावावर रोजगार सेवक शासनाची दिशाभूल करीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे त्या रोजगार सेवकावर कारवाई होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.मुरपार/लेंडेझरी येथील बोडी खोलीकरण गट क्र.१८ ग्राम पंचायत मुरपार/लेंडेझरी हिरालाल मलगाम यांचे शेतालगत ३० मे २०२४ ते ५ जून २०२४ च्या शासकीय रोहयोच्या मस्टरमध्ये मुरपार येथील रोहीत आनंदराव मसराम व अक्षय हेमराज टेकाम यांचे नावे या हजेरी पत्रकावर नोंद असल्याचे दिसून आले. तर सदर दोन्हीं व्यक्तींची नावे त्याच दिवशी व त्याच तारखेला नागझिरा व्याघ्र प्रकल्प अंतर्गत सातमोडी वाच टावर कामावर २९ फेब्रुवारी २०२४ ते १ जून २०२४ या कालावधीत तिमाही कामासाठी कामावर असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी नागझिरा, साकोली वन्यजीव कार्यालयातून माहिती अधिकारात माहिती मिळाली. ग्रामपंचायतचे रोहयोचे काम पाहणारे रोजगार सेवक यांचे केलेल्या प्रत्येक रोहयो कामाची सखोल चौकशी केल्यास बरेच मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणाची चौकशी करून दोषी रोजगार सेवकाला निलंबित करावे, अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणाचा खंडविकास अधिकारी यांनी r चौकशी न केल्यास उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार दाखल करण्यात येईल, असे ग्रामपंचायत सदस्य अरुण वासनिक यांनी सांगितले. .
…………….
ग्रा.पं.सदस्याला दमदाटी
या प्रकरणाची पोलखोल झाल्याने रोहयो सुरू असलेला भ्रष्टाचार समोर आला आहे. भ्रष्टाचाराची पोलखोल करणार्या ग्राम पंचायत सदस्य अरूण वासनिक यांना धमकी व दमदाटी देवून धाक दाखविला जात आहे. धमकी देऊन प्रताडीत केल्याप्रकरणी अरूण वासनिक यांनी १५ ऑक्टोबर २०२५ रोजी डुग्गीपार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली.

