LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

महसूल विभागातर्फे 1 ते 7 ऑगस्टदरम्यान “महसूल सप्ताह”

नागरिकांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबविणार
भंडारा (Bhandara News ) : राज्य शासनाच्या निर्देशानुसार महसूल दिनानिमित्त दिनांक 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत “महसूल सप्ताह” भंडारा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना महसूल संबंधित सेवा सुलभपणे व वेगाने मिळाव्यात, हा उद्देश असून, सप्ताहाच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. नागरिकांनी या सप्ताहादरम्यान आपली कामे करून घ्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकार परिषदेला अपर जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव, निवासी उपजल्हाधिकारी लीना फलके-ढेंगे प्रामुख्याने उपस्थित होते.
 जिल्हाभरात 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत “महसूल सप्ताह” राबविण्यात येत असून नागरिकांचे महसूल विषयक प्रश्न त्वरित निकाली काढणे,  विविध प्रमाणपत्रे व दस्तऐवजांचे वितरण करणे, जमिनीशी संबंधित तक्रारींचे निराकरण, शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचवणे या उदेश्याने हा सप्ताह राबविण्यात येत आहे.  सप्ताहादरम्यान 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन  व महसूल सप्ताहाचा शुभारंभ, महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी संवाद, उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे. 2 ऑगस्ट रोजी अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्यात येतील. 3 ऑगस्ट रोजी पाणंद, शिवरस्त्यांची मोजणी करुन त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्यात येतील. 4 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबविण्यात येईल. 5 ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करुन डिबीटी करुन अनुदानाचे वाटप करण्यात येईल. 6 ऑगस्ट रोजी शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासनाच्या धोरणानुसार निर्णय म्हणजेच नियमानुकूल, सरकारजमा करण्यात येईल. 7 ऑगस्ट रोजी कृत्रिम वाळू धोरणाची अंमलबजावणी व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे धोरण पूर्णत्वास नेणे व महसूल सप्ताहाची सांगता करण्यात येईल.  
सप्ताह तहसील व तलाठी कार्यालयातही साजरा करण्यात येणार आहे. तहसील कार्यालयांमध्ये अर्जदारांशी थेट संवाद साधून तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहेत.  तसेच महसूल न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत. तलाठी कार्यालयात वृक्षारोप करण्यात येणार आहे.  
 जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडून या महसुल सप्ताह आयोजन करून महसूल कर्मचारी गावपातळीवर जाऊन नागरिकांना सेवा प्रदान करणार आहेत. डिजिटल माध्यमांतून अर्ज स्वीकृती व नोंदणी केली जाईल. प्रमाणपत्र वाटप करण्यात येतील. वृद्ध, दिव्यांग व गरजू नागरिकांसाठी घरोघरी सेवा दिल्या जाईल. जिल्हा प्रशासन, पंचायत समिती, ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्था आणि स्थानिक स्वयंसेवी संस्था यांचे समन्वयाने हा महसुल सप्ताह प्रभावीपणे राबविला जाणार आहे. यामध्ये महसूल विभागासोबत विभागांचाही सहभाग राहणार आहे.  महसूल सप्ताहादरम्यान महसूल कार्यालयात अर्जांची तत्काळ पूर्तता केली जाणार असून, अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश  जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी दिले आहेत. “महसूल आपल्या दारी” या संकल्पनेतून प्रत्येक नागरिकापर्यंत महसुल सप्हाहाच्या माध्यमातून सेवा पोहोचविण्यासाठी प्रशासनाचा सज्ज झाला असून नागरिकांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी केले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *