LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रशैक्षणिक

प्राथमिक शिक्षकांना आता अंगणवाडीचीही जबाबदारी

शासनाचा नवा ‘एक दिवस अंगणवाडी’ उपक्रमग्रामीण मुलांना शाळेत आणण्यासाठी प्रभावी उपाय

गोंदिया : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांना आता आठवड्यातून किमान एक दिवस अंगणवाडीत शिकवावे लागणार आहे. शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या पत्रानुसार, शिक्षकांनी आपल्या शाळेच्या एक किलोमीटर परिघातील अंगणवाड्यांमध्ये जाऊन मुलांचा प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करावा. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील लहान मुलांना शालेय जीवनाची चांगली सुरुवात होईल, असा विश्वास शासन व्यक्त करत आहे.नव्या शैक्षणिक धोरणानुसार अंगणवाडी (पूर्व प्राथमिक) आणि पहिलीचा वर्ग एकाच स्तरावर आणण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. यासाठी प्राथमिक शाळांतील शिक्षक, विशेषतः पहिलीच्या वर्गाला शिकविणारे शिक्षक, आठवड्यातील एक दिवस अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन करतील. पूर्व बालशिक्षण व संगोपन या विषयावर लक्ष केंद्रित करुन अंगणवाडीतील मुलांना प्राथमिक शिक्षणाची ओळख करुन देणे, हा मुख्य हेतू आहे. पुण्यातील विद्या प्राधिकरणाच्या मदतीने तयार केलेल्या ‘आकार’ अभ्यासक्रमात पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे असून, सेविकांना प्राथमिक शिक्षकांची मदत अनिवार्य करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे अंगणवाडीतील लहान मुलांना शाळेच्या अभ्यासक्रमाची तयारी होईल आणि त्यांचा पाया खंबीर होईल, असे शासनाचे मत आहे. मात्र, आधीच शाळेतील कामाचा बोजा वाढलेल्या शिक्षकांवर ही अतिरिक्त जबाबदारी कशी पार पडेल, याबाबत शिक्षकांमध्ये कुतुहल आहे.जिल्हा परिषद शाळांतील १५ ऑगस्ट, २६ जानेवारीसह स्नेहसंमेलने, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अंगणवाडीतील मुलांचा सहभाग घ्यावा, असेही आदेश आहेत. शाळांच्या वार्षिक परीक्षा संपल्यानंतर अंगणवाडी मुलांनी वयोगटानुसार ‘आकार’ अभ्यासक्रम केल्याची खात्री शिक्षकांनी करावी. अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या मुलांना शिक्षक व अंगणवाडी सेविकांच्या पूर्ण स्वाक्षरीसह प्रमाणपत्र देण्यात येईल, ज्यामुळे त्यांना पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळेल. या माध्यमातून प्राथमिक शाळांची पटसंख्या वाढविण्याचे शासनाचे मोठे ध्येय आहे. ग्रामीण भागात अंगणवाड्यांमधील मुलांना शाळेत आणण्यासाठी हा एक प्रभावी उपाय ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *