LatestNewsगोंदियाविदर्भ

पुजारीटोला मत्स्यपालन सहकारी संस्थेत सव्वा कोटींची अफरातफर; ११ संचालकांवर गुन्हा दाखल

गोंदिया : कोटरा येथील पुजारीटोला मत्स्यपालन सहकारी संस्थेत लाभार्थ्यांना नायलॉन जाळे अनुदान वाटपात १ कोटी १७ लाख ९५ हजार ७२० रुपयांची अफरातफर झाल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी राजेश केशवराव शहारे (५२) यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी मंगळवारी (ता. २४) संस्थेच्या अकरा संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. संस्थेच्या संचालकांनी नायलॉन जाळे अनुदान वाटप करताना लाभार्थी निवड प्रक्रियेचे पालन केले नाही, तसेच अनुदान वाटपाचे मूळ प्रमाणित पुरावे रेकॉर्डवर उपलब्ध नाहीत. मजुरीपोटी ७० लाख ६१ हजार ७७० रुपये वाटप केल्याचे दाखवले असले तरी, त्यातील ३४ लाख २३ हजार ९५० रुपये कोणाला दिले, याचे कोणतेही विवरण किंवा स्वाक्षरी रेकॉर्डवर नाही. याव्यतिरिक्त, कर्मचाऱ्यांच्या मानधनापोटी १२ लाख २५ हजार रुपयांच्या वाटपाचेही मूळ पुरावे गायब आहेत.संचालकांनी कट रचून बनावट ताळेबंद पत्रक तयार करून ही रक्कम परस्पर उचलून अफरातफर केली. या प्रकरणी पोलिसांनी विनोद मंगरू कागदीमेश्राम (६०, रा. कोटरा), धनराज परसराम शेंडे (४५, रा. लोहारा), संजय कागदीमेश्राम, गुजोबाजी बारूक मेश्राम (७८), आत्माराम भुते (५५), देवेंद्र हरिश्चंद्र कोटांगले, भीमराज मरस्कोल्हे, प्रेमलाल मोतीराम मेश्राम, रघुनाथ बिसन मोरदेवे, पुरुषोत्तम चैतराम ढवरे व एका महिला संचालिकेवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भूषण बुराडे करीत आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *