“स्वस्थ नारी, सशक्त परिवार”या विशेष राष्ट्रीय अभियानाचा जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे शुभारंभ
भंडारा : केंद्र सरकार व राज्य शासनाच्या सहकार्याने आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” हे विशेष राष्ट्रीय अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान भंडारा जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये राबविण्यात येणार आहे.
या अनुषंगाने आज बुधवार, १७ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उभारलेल्या भव्य मंडपात पंतप्रधान यांच्या उद्घाटन कार्यक्रमाचे जिल्हा धार, मध्यप्रदेश येथून थेट प्रसारण करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या पत्नी डॉ. प्रांजली पडोळे, श्री. आनंद मलेवार (सभापती आरोग्य व वित्त समिती, जि.प. भंडारा), श्री. आशु गोडाने (जिल्हाध्यक्ष भाजप), डॉ. मनीष नंदनवार व श्री. मंगेश वंजारी (मा. आमदार श्री. नरेंद्र भोंडेकर यांचे प्रतिनिधी) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास डॉ. विपुल अंबादे (अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भंडारा), डॉ. संदीपकुमार गजभिये (जिल्हा शल्यचिकित्सक), डॉ.मिलिंद सोमकुंवर (जिल्हा आरोग्य अधिकारी), डॉ. अतुल कुमार टेंभुर्णे (अति. जिल्हा शल्यचिकित्सक), विविध विभागांचे अधिकारी, तज्ञ डॉक्टर, परिचर्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थीनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अभियानाअंतर्गत महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये शिबिरे आयोजित केली जातील. यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंड, स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी, क्षयरोग तपासणी, किशोरवयीन मुलींसाठी ॲनिमिया तपासणी, आदिवासी महिलांसाठी सिकल सेल तपासणी व समुपदेशन आदी सेवा पुरविण्यात येतील. माता व बाल आरोग्य तपासणी, लसीकरण, आयुष अंतर्गत आयुर्वेद, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी आदी पर्यायी उपचारपद्धती, किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी स्वच्छता व पोषणाविषयी जनजागृती, महिला बचत गटांमार्फत निरोगी जीवनशैलीबाबत समुपदेशन अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. १ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिनानिमित्त इंडियन रेड क्रॉस सोसायटी व इतर संस्थांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरे घेण्यात येतील. तसेच, आयुष्यमान भारत डिजीटल मिशन कार्ड व पीएम-जय कार्ड वाटप, क्षयरोग निर्मूलनासाठी निक्षय मित्र स्वयंसेवकांची नोंदणी, गरजू रुग्णांना मोफत तपासण्या व शस्त्रक्रिया सुविधा पुरवल्या जाणार आहेत. भंडारा जिल्ह्यातील सर्व महिलांनी या “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

