शेतमजूर युनियनटची तहसीलवर धडक
गोंदिया : महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीने भुमिहिन, शेतमजूर, वनहक्क, वृध्द पेंशन आदि विविध मागण्यांना घेवून आज (ता.१९) गोंदिया व तहसील कार्यालयावर धडक देत आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या माध्यमातून शेतमजूर, वनहक्क धारक, वृध्द पेंशन धारकांच्या समस्यांकडे शासन व सरकारचे लक्ष वेधण्यात आले. प्रलंबित समस्या मार्गी लावण्यात यावे, अशी मागणी तहसीलदारमार्फत शासनाकडे करण्यात आली.
वन हक्क जमीनीचे पट्टे द्या, श्रावण बाळ, वृध्दापकाळ, संजय गांधी निराधार योजना, बीपीएल लाभार्थ्यांना १० तारखेच्या आत थकीत असलेली अर्थसहाय्य देण्यात यावे, मनरेगाची दैनिक मजूरी ६०० रूपये करण्यात यावे, शेतमजूरांना मासिक पेंशन ६ हजार रूपये करण्यात यावे, नवीन रेशन कार्ड मोहीम सुरू करण्यात यावी आदि विविध मागण्यांना घेवून महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीने १९ सप्टेंबर गोंदिया व गोरेगाव येथे आंदोलन करण्यात आले. गोंदिया येथील प्रशासकीय इमारतीसमोर घोषणाबाजी करून सरकारविरूध्द प्रदर्शन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व लाल बावटा शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद उके, भाकपचे जिल्हा सहसचिव परेश दुरुगवार, रामचंद्र पाटील यांनी केले. तहसीलदार शमशेर पठाण यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात जितु गजभिये, सुरेश रंगारी, प्रकाश डहाट, विमला रामटेके, हेमराज खांडेकर, मधुकर नागवंशी व अनेक कर्यकर्ते उपस्थित होते. गोरेगाव येथे गोरेगांव बसस्थानक येथून तहसील कार्यालयपर्यत मोर्चा काढण्यात आला. मोर्च्याचे नेतृत्व राज्य उपाध्यक्ष हौसलाल रहांगडाले, कल्पना डोंगरे, अशोक मेश्राम, गुणवतराव नाईक, दुलीचंद कावडे यांनी केले. वनजमिनीवर अतिक्रमण करणार्यांना मालकी पट्टे देण्यात यावे, जमीन सोडण्याचे नोटीस मागे घेण्यात यावे, शेतमजुरांना पेंशन लागु करण्यात यावी, मनरेगाची मजुरी ६०० रूपये करण्यात यावी, नवीन रेशन कार्ड बनविण्याची मोहीम सुरू करावी, निराधारांना महिन्याच्या १० तारखेला मानधन देण्यात यावे, आदि विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार मार्फत राज्य शासनाला देण्यात आले. या आंदोलनात पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.

