LatestNewsगोंदिया

Prahar janshakti party : मागण्यांची कात्रणे शरीरावर चिकटवून रोष व्यक्त

प्रहारच्या आगळ्यावेगळ्या आंदोलनाने वेधले लक्ष

तिरोडा : प्रहार जनशक्ती पक्षाच्या (Prahar janshakti party) वतीने आज (ता.१९) जिल्हाधिकारी कार्यालयात आगळेवेगळे आंदोलन करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. पोलिस ठाणे, शेती, सिंचन, रेल्वे निवेदने, गाड्या आणि पशु विमा यासह १४ मागण्यांना घेवून आंदोलन करण्यात आले. दरम्यान तालुकाध्यक्ष प्रदिप निशाने यांनी मागण्यांची कात्रणे शरीरावर चिकटवून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. या आंदोलनाची अनोखी पद्धत जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चेचा विषय बनली होती. तालुक्यातील मुंडीकोटा येथे पोलिस स्टेशन व ग्रामीण रूग्णालयाची निर्मिती करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह इतर १४ मागण्यांना घेवून प्रहार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महिनाभरापूर्वी या संदर्भात जिल्हा व तालुका प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. परंतु, निवेदनाकडे दुर्लक्ष करण्यात आले.

शासन, प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुंडीकोटा मुख्य व केंद्र गाव असूनही मुलभूत सुविधा, लहान-सहान कामांकरीता तिरोडा गाठावे लागत आहे. परिणामी नागरिकांना वेळ व आर्थिक भुर्दड बसत आहे. याकरीता मुंडीकोटा येथे पोलिस स्टेशन व ग्रामीण रूग्णालयाची निर्मिती करण्यात यावी, शेतीला सिंचन सुविधा निर्माण करावी, प्रमुख रेल्वेगाड्यांचे थांबे देण्यात यावे, विमाचा लाभ शेतकर्‍यांना देण्यात यावा, आदि १४ मागण्यांना घेवून प्रहारच्या (Prahar janshakti party) वतीने आगळवेगळे आंदोलन करण्यात आले. तालुकाध्यक्ष प्रदीप निशाने यांनी १४ मागण्या कागदावर लिहून त्यांची कात्रणे शरीरावर चिकटवून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. निवेदन सादर करण्याची ही अनोखी पद्धत जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चेचा विषय बनली आहे.(Prahar janshakti party) या आंदोलनात वामन हजारे, धनलाल उके, कमलेश चिंचुकर, विनोद कटवाले, दीपक चामट, सुरेंद्र सूर्यवंशी, चंदू गायधने व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. आठ दिवसांत मागण्यांचा विचार करण्यात आला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही प्रहार जनशक्ती पक्षाने दिला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *