LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

अवघ्या दोन तासात लावला अल्पवयीन मुलीचा शोध

ऑपरेशन मुस्कानची यशस्वी कारवाई
नवेगावबांध : गोंदिया जिल्हा पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत एका अल्पवयीन मुलीचा अवघ्या दोन तासांत शोध लावून अत्यंत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. १३ फेब्रुवारी रोजी बेपत्ता झालेल्या १४ वर्षीय मुलीला चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथून सुरक्षितरीत्या ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.
नवेगावबांध पोलीस स्टेशन हद्दीतील एक १४ वर्षे ७ महिने वयाची मुलगी १३ फेब्रुवारीच्या सायंकाळी दुकानात सामान आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. मात्र, बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नाही. अज्ञात इसमाने तिचे अपहरण केल्याची शंका पालकांनी व्यक्त केली होती. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३७(२) अन्वये गुन्हा (अप.क्र. ५५/२०२६) दाखल केला. तक्रार मिळताच पोलीस निरीक्षक अजित पाटील यांनी तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवण्यात आली. अवघ्या दोन तासांच्या आत पोलिसांनी मुलीचा माग काढत तिला ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) येथून सुखरूप शोधून काढले.
महाराष्ट्र पोलीस दलातर्पेâ २० जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी विशेष ‘ऑपरेशन मुस्कान’ राबवले जात आहे. या मोहिमेचा सकारात्मक परिणाम या कारवाईतून दिसून आला. गोंदिया पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. अजित पाटील, पो.उपनि. अमोल भोसले आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी फत्ते केली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *