बीयरबारच्या विरोधात ग्रामस्थांचा उद्रेक
धोबाटोला येथील प्रकार : काही नागरिकांवर गुन्हा दाखल
गोंदिया : देवरी तालुक्यातील धोबाटोला येथील बीयर बारला गावकर्यांनी विरोध दर्शविला होता. यासाठी प्रशासनाला वारंवार निवेदन देवून बियर बार हटविण्याची मागणी केली होती. यासाठी अनेकदा आंदोलन झालीत. मात्र प्रशासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केल्याने गावकर्यांचा उद्रेक झाला. परिणामी संतप्त गावकर्यांनी बीयर बारची तोडफोड करीत रोष व्यक्त केला. या प्रकरणाला घेवून चांगलेच तापले असून पोलिसांनी दखल घेत काही गावकर्यांवर गुन्हा नोंद केला आहे.देवरी तालुक्यातील उचेपूर ग्रामपंचायत अंतर्गत धोबाटोला गावात अरमान बारच्या विरोधात गावकर्यांचे मागील ३ महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. यात काही ग्रामस्थांकडून उपोषणही करण्यात येत आहे. दरम्यान, १८ फेब्रुवारी रोजी उचेपूर ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामसभेत बार सुरू ठेवायचा की बंद करायचा यासाठी हात उचलून मतदान करण्यात येत होते. सायंकाळी ५ वाजतापर्यंत सुरू असलेल्या मतदानादरम्यान बारमालकाने ग्रामसभेत हस्तक्षेप केले. हस्तक्षेप होत असल्याचे पाहून ग्रामस्थांचा संघर्षाने उग्ररूप धारण केले. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी आमची सही व मतदान प्रशासनिक अधिकारी घेत नसल्याचा ठपका ठेवत गोंधळ घातला. यानंतर संतप्त गावकर्यांनी थेट बारकडे मोर्चा वळवत बारमध्ये घुसून फर्निचरची तोडफोड करत दारूच्या बाटल्या फोडल्या. याप्रकरणी चिचगड पोलिसांनी ३० गावकर्यांवर गुन्हा दाखल केला असून १२ जणांना अटक करण्यात आली असून अटक केलल्या आरोपींमध्ये काही महिलांचाही समावेश आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून सर्वत्र स्मशान शांतता पसरलेली आहे. एंकदरीत किमान आतातरी प्रशासन जागे होवून बीयर बार बंद करणार का? व गुन्हे दाखल झालेल्या ग्रामस्थांवर गुन्हे मागे घेणार का? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

