५३४० शेतकर्यांना मिळाले चुकारे
एकाच दिवशी ४६.७२ कोटीचा निधी खात्यात
गोंदिया : रब्बी हंगामातील धानखरेदीचे चुकारे व बोनसची रक्कम अनेक शेतकर्यांना न मिळाल्याने शेतकरी अडचणीत आले होते. चुकार्याच्या प्रतिक्षेत दिवाळी सण अंधारात जाणार का? अशी शक्यता वर्तविण्यात येत असतानाच पणन विभागाकडून जिल्ह्यातील ५३४० शेतकर्यांच्या खात्यात चुकारे अदा करण्यात आले. एकाच दिवशी तब्बल ४६.७२ कोटीचा निधी शेतकर्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याने दिवाळीच्या तोंडावर चुकार्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील धान उत्पादकांना शासकीय हमी भाव केंद्रावर धन विक्री करून महिने लोटले असताना धानाची रक्कम मिळाली नसल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकर्यांना शासनाने ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर निधी उपलब्ध करून आधार दिला आहे. आज ६ ऑक्टोबर रोजी जिल्हा पणन कार्यालयाने ५३४० शेतकर्यांच्या बँक खात्यावर तब्बल ४६ कोटी ७२ लाख ६२ हजार ४९५ रुपये थेट हस्तांतरीत केले. यामूळे धान उत्पादकांना मोठा आधार मिळणार आहे. शुक्रवार ३ ऑक्टोबर रोजी शासनाने धान खरेदीचे १२५ कोटी ७७ लाख ४७ हजार २२५ रुपयाचा निधी जिल्हा पणन कार्यालयाकडे हस्तांतरीत केला होता. ४ ऑक्टोबर रोजी ३२२६ शेतकर्यांच्या बँक खत्यावर २७ कोटी ६५ लाख ७ हजार ५९१ रुपये जमा करण्यात आले होते. जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात ७० हजार हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड करण्यात आली होती. जिल्हा पणन कार्यालयाच्या उपअभिकर्ता संस्थांनी ५३१५८ शेतकर्यांकडून विक्रमी २५ हजार १३ हजार ३४४ क्विंटल धान केले. खरेदी केलेल्या धानाची किमत ५७८ कोटी ६ लाख ९१ हजार ३६१ आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत ३५१ कोटी ३१ लाख २४ हजार ८११ रुपये तर ३ ऑक्टोबर रोजी १२५ कोटी ७७ लाख ४७ हजार २२५ रुपये, असे ४७७ कोटी ८ लाख ७२ हजार ३६ रुपये जिल्हा पणन कार्यालयाला शासनाकडून प्राप्त झाले आहे. आतापर्यंत ४२ हजार ५५१ शेतकर्यांच्या खात्यावर ४१३.१२ वर्ग झाले आहेत यामूळे धान उत्पादकांची दिवाळी गोड होणार आहे.

