LatestNewsगोंदियाविदर्भ

विदेशी पाहुण्यांच्या स्वागतावर प्रश्नचिन्ह; पाण्याची पातळी घटल्याने चिंता वाढली

सरासरीपेक्षा कमी पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील जलसाठ्यात घट
भंडारा:
तलावांचा आणि जलाशयांचा समृद्ध जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात दरवर्षी हिवाळ्यात सायबेरिया, रशिया, मंगोलिया आणि मध्य आशियातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून स्थलांतरित पक्षी दाखल होतात. यामध्ये नॉर्दर्न पिनटेल, गडवाल, रेड क्रेस्टेड पोचार्ड, कॉमन पोचार्ड, नॉर्दर्न शॉवेलर, गार्गनी आणि बार-हेडेड गूज यांसारख्या प्रमुख प्रजातींचा समावेश असतो. मात्र, यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये जलसाठा कमी झाला आहे. परिणामी, यंदा विदेशी पक्ष्यांच्या आगमनाबाबत आणि त्यांच्या वास्तव्याबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत काही स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे. उल्लेखनीय म्हणजे, ११ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या आशियाई जलपक्षी गणनेदरम्यान भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील २४ प्रमुख जलाशयांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात स्थानिक आणि विदेशी अशा एकूण ७८ प्रजातींचे ६,६९९ पक्षी नोंदवले गेले होते.
सुरक्षित निवारा आणि संवर्धनाची गरज:
जिल्ह्यातील रावणवाडी, मांगली, आसलपाणी, शिवनीबांध, खुर्शीपार धरण, आंबागड, गोसीखुर्द धरण परिसर व जलाशय तसेच कोका अभयारण्य आणि जंगलालगतचे जलस्रोत हे जलपक्ष्यांचे प्रमुख आश्रयस्थान आहेत. याशिवाय जंगलव्याप्त परिसरातही स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांची समृद्ध जैवविविधता पाहायला मिळते. तलावांमध्ये सांडपाणी मिसळणे, काठावर होणारे अतिक्रमण, कचरा टाकणे आणि अनियंत्रित मासेमारी यांसारख्या मानवी हस्तक्षेपामुळे पक्ष्यांच्या स्थलांतरावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. यंदा जिल्ह्यातील जलाशयांमध्ये येणाऱ्या विदेशी पक्ष्यांची संख्या, प्रजाती आणि त्यांच्या वास्तव्याच्या कालावधीची नियमित नोंद ठेवणे गरजेचे आहे. वन विभाग, पक्षीतज्ज्ञ आणि स्थानिक निसर्गप्रेमींकडून संयुक्तपणे नियमित पक्षी गणना केल्यास बदलत्या परिसंस्थेचे (इकोसिस्टम) खरे चित्र समोर येऊ शकेल. विदेशी पक्ष्यांचे आगमन हे जिल्ह्यातील पाणथळ परिसंस्थेच्या उत्तम आरोग्याचे प्रमाण असल्याने यंदा त्यांना सुरक्षित व अनुकूल वातावरण उपलब्ध करून देणे हेच मोठे आव्हान ठरणार आहे.
स्थलांतरित पक्ष्यांसाठी अनुकूल वातावरण आवश्यक:
पक्षीतज्ज्ञांच्या मते, स्थलांतरित जलपक्ष्यांसाठी तलावात केवळ पाणी असणेच पुरेसे नसते, तर उथळ पाणी, दलदलीचे किनारे, जलीय वनस्पती, लहान मासे, कीटक आणि जलचर जीवांच्या स्वरूपात पुरेसे अन्न उपलब्ध असणेही तितकेच महत्त्वाचे असते. यासोबतच किनाऱ्यांवर सुरक्षित विश्रांतीची ठिकाणे, शिकारी प्राण्यांपासून संरक्षण आणि मानवी हस्तक्षेप नसणे आवश्यक आहे. पाण्याची पातळी अत्यंत कमी झाल्यास काही ठिकाणी दलदलीचे किनारे तयार होऊन किनारी पक्ष्यांना अन्न मिळते; परंतु पाणथळ जागा पूर्णपणे कोरड्या पडल्यास मासे व इतर जलचर जीवांची कमतरता निर्माण होते. दुसरीकडे, तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले असल्यास आणि उथळ किनाऱ्यांचा अभाव असल्यासही अनेक प्रजातींना अन्न शोधण्यात अडचणी येतात. त्यामुळे पाण्याचा समतोलच पक्ष्यांच्या स्थलांतरासाठी निर्णायक ठरतो.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *