children aadhaar update : 5 ते 15 वयोगटातील मुला-मुलींचे आधारबायोमेट्रिक अपडेट करणे अनिवार्य
गोंदिया : वर्ष 5 ते 15 वयोगटातील मुला-मुलींचे आधार बायोमेट्रिक अद्ययावत (children aadhaar update) करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी दि.15 ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यान शिबिराचे आयोजन केले आहे.
निरीक्षणात आढळून आले आहे की, पाच ते पंधरा वर्षे वयोगटातील मोठ्या प्रमाणावर मुलांनी आपले कोर बायोमेट्रिक दिलेले नाहीत, त्यामुळे त्यांचे एमबीयु-1 प्रलंबित आहे. तसेच पंधरा वर्षानंतर अनेक विद्यार्थ्यांनी बायोमेट्रिक अद्ययावत (children aadhaar update) केलेले नाहीत म्हणून त्यांचे एमबीयु-2 प्रलंबित आहे. यामुळे जेव्हा बायोमेट्रिक प्रमाणिकरणाची आवश्यकता भासते उदा. जेईई किंवा नीट सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये बसताना तेव्हा एकदम मोठ्या प्रमाणावर अद्ययावत करण्यासाठी गर्दी होते. वेळेत बायोमेट्रिक अद्ययावत न झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अडचणींचा सामाना करावा लागतो. म्हणुनच एमबीयु-1 व एमबीयु-2 वेळेत पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे.
पाच वर्षाखालील मुलांचे आधार नोंदणी करताना केवळ चेहऱ्याचा फोटो आणि लोकसंख्याशास्त्रीय माहिती घेतली जाते. या वयाच्या टप्प्यावर बोटांचे ठसे व डोळयाच्या बुबुळाचे बायोमेट्रिक घेतले जात नाहीत. आधार (नोंदणी व अद्ययावत) नियमानुसार पाचव्या वर्षी व पंधराव्या वर्षी अनिवार्य बायोमेट्रिक अद्ययावत करणे बंधनकारक आहे.
मुलगा/मुलगी पाच वर्षाचा झाल्यावर प्रथमच बोटांचे ठसे व डोळ्याच्या बुबुळाचे बायोमेट्रिक तसेच अद्ययावत चेहऱ्याचा फोटो द्यावा लागतो. याला सामान्यत: एमबीयु-1 असे म्हटले जाते. पंधरा वर्षाचा झाल्यावर पुन्हा सर्व तीनही बायोमेट्रिक अद्ययावत करणे आवश्यक असते, याला एमबीयु-2 म्हणतात. प्रलंबित एमबीयुज पूर्ण करण्यासाठी शाळांमार्फत शिबीर पध्दतीने काम करणे उपयुक्त ठरेल. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया मार्फत दि.15 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत एमबीयु-1 आणि एमबीयु-2 साठी आधार शिबीर घेण्यात येणार आहे.
आधार प्रमाणिकरणाच्या निर्देशानुसार 5 ते 15 वयोगटातील मुलांचा अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट (children aadhaar update) मोहिमेचा प्रारंभ जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात येत आहे. ही मोहिम शालेय (ज्या शाळेत जास्त एमबीयु प्रलंबित आहेत) स्तरावर राबविण्यात येत आहे. शाळा आणि आधार ऑपरेटरनिहाय नियोजन आहे. पालकांनी आपल्या पाल्यांचे बायोमेट्रिक अपडेट अनिवार्यपणे करुन घ्यावे. अपडेट न झाल्यास विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यास अडचण होवू शकते, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक हरिचंद्र पौनिकर यांनी केले आहे.
………………………
या ठिकाणी शिबिर आयोजित केलेले आहेत
विवेक मंदिर स्कुल छोटा गोंदिया, मनोहरभाई पटेल हायस्कुल देवरी, आदर्श विद्यालय आमगाव. गुजराती नॅशनल हायस्कुल एस.एम.पटेल ज्युनियर कॉलेज गोंदिया, शहिद मिश्रा विद्यालय तिरोडा, सरस्वती विद्यालय अर्जुनी/मोरगाव, आदिवासी विकास हायस्कुल खजरी, नवोदय हायस्कुल केशोरी, राजक्रिष्ण विद्यालय कुऱ्हाडी, आर.जे.लोहिया सेकंडरी ॲन्ड हायर सेकंडरी स्कुल सौंदड, सालेकसा हायस्कुल सालेकसा.

