‘एचएसआरपी’ (HSRP) नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर धडक कारवाईचे आदेश
जिल्ह्यात २० ते ३० नोव्हेंबरदरम्यान विशेष मोहीम!
परिवहन आयुक्तांचे कठोर निर्देश
गोंदिया : वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक (HSRP – हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बसविण्यासाठी वारंवार मुदतवाढ देऊनही दुर्लक्ष करणाऱ्या वाहनधारकांविरोधात परिवहन विभागाने आता कठोर पावले उचलली आहेत. परिवहन आयुक्तांनी राज्यभरात २० ते ३० नोव्हेंबरदरम्यान विशेष तपासणी व कारवाई मोहीम राबविण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार गोंदिया उपप्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) कंबर कसली असून, ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर धडक कारवाई सुरू केली आहे.
वाहनधारकांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवून घेण्यासाठी ३० जून २०२६ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यानंतर १ जुलैपासून कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, प्रशासनाच्या वारंवार आवाहनानंतरही वाहनधारकांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील ७० हजारांहून अधिक वाहनांना अद्याप प्लेट नाही
आरटीओ विभागाच्या आकडेवारीनुसार, गोंदिया जिल्ह्यात एकूण १ लाख ७८ हजार वाहने ‘एचएसआरपी’च्या कक्षेत येतात. या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसविणे बंधनकारक आहे. मात्र, मुदत संपून अनेक महिने लोटल्यानंतरही जिल्ह्यातील सुमारे ७० हजारांहून अधिक वाहनधारकांनी अद्याप आपल्या वाहनांना ‘एचएसआरपी’ बसवून घेतलेली नाही.
३० नोव्हेंबरपर्यंत चालणार विशेष मोहीम
वाहनधारकांचा हा निष्काळजीपणा लक्षात घेता परिवहन आयुक्तांनी आता थेट कारवाईचे आदेश दिले आहेत. २० ते ३० नोव्हेंबर या कालावधीत सर्व जिल्हास्तरावर विशेष मोहीम राबवून विना-एचएसआरपी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी वाहनधारकांनी तात्काळ आपल्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

