LatestNewsगोंदियामहाराष्ट्र

वनरक्षकाच्या सतर्कतेने टळले बिबट्याचे संकट; उघड्यावर झोपलेल्या ७ परप्रांतीय मजुरांचे वाचले प्राण!

नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान परिसरातील थरारक घटना
अर्जुनी मोरगाव (गोंदिया) :
धान मळणीसाठी पंजाब राज्यातून आलेले सात मजूर रात्रीच्या वेळी उघड्यावर गाढ झोपेत असताना, दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या दिशेने झेप घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी रात्रीच्या गस्तीवर असलेल्या वनविभागाच्या बीट गार्डने प्रसंगावधान राखून वेळीच मोठा आवाज केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. वनरक्षकाच्या तत्परतेमुळे झोपेत असलेल्या सात निष्पाप मजुरांचे प्राण थोडक्यात वाचले. ही अंगावर काटा आणणारी थरारक घटना २४ ऑक्टोबरच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान परिसरात घडली.
गोंदिया जिल्हा हा धानाचे कोठार म्हणून ओळखला जातो. सध्या जिल्ह्यात खरीप हंगामातील धान कापणी व मळणीच्या कामांना वेग आला आहे. मळणीच्या कामासाठी पंजाब राज्यातून तीन हार्वेस्टर (धान मळणी यंत्र) आणि मजुरांचे पथक नवेगाव बांध परिसरात दाखल झाले आहे. प्रत्येक यंत्रावर सुमारे सात मजुरांचा गट कार्यरत आहे. दिवसभराचे काम आटोपल्यानंतर हे मजूर रात्रीच्या विश्रांतीसाठी सुरक्षित जागा शोधत होते. २४ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांनी नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान परिसरातील वनविभागाच्या कॉलनीलगत मुक्काम केला आणि जेवण आटोपून सर्वजण उघड्यावरच गाढ झोपी गेले.
राष्ट्रीय उद्यान परिसर असल्याने या भागात वाघ, बिबट्यांसह हिंस्त्र वन्यजीवांचा मोठा वावर असतो. त्यामुळे येथे उघड्यावर झोपणे जीवावर बेतू शकते, याची जाणीव वनविभागाचे बीट गार्ड विक्रांत अर्जुन ब्राह्मणकर यांना होती. त्यांनी सायंकाळीच मजुरांना त्या ठिकाणी उघड्यावर न झोपता सुरक्षित ठिकाणी जाण्याची ताकीद दिली होती. मात्र, मजुरांनी या सूचनेकडे दुर्लक्ष करत तिथेच झोपणे पसंत केले.
बिबट्या झेप घेण्याच्या तयारीत असतानाच गाडी पोहोचली!
दरम्यान, रात्री ११ वाजेच्या सुमारास बीट गार्ड विक्रांत ब्राह्मणकर शासकीय चारचाकी वाहनाने परिसरात गस्त घालत होते. वाहनाचा प्रकाश पडताच, एक बिबट्या गाढ झोपेत असलेल्या मजुरांच्या अगदी जवळ दबा धरून बसल्याचे आणि त्यांच्यावर झेप घेण्याच्या तयारीत असल्याचे ब्राह्मणकर यांच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ब्राह्मणकर यांनी क्षणाचाही विलंब न करता वाहनाचा हॉर्न वाजवत मोठ्याने आरडाओरड केली. अचानक झालेल्या वाहनाचा प्रकाश आणि आवाजामुळे बिबट्या बिथरला व त्याने तात्काळ जंगलाच्या दिशेने पळ काढला.
मजुरांनी मानले वनरक्षकाचे आभार
ब्राह्मणकर यांनी तात्काळ वाहनातून उतरून गाढ झोपेत असलेल्या मजुरांना जागे केले आणि काही क्षणांपूर्वी त्यांच्यावर ओढवलेल्या मृत्यूच्या संकटाची जाणीव करून दिली. समोर साक्षात मृत्यू उभा असल्याचे कळताच मजुरांचा थरकाप उडाला. त्यांनी तातडीने आपले अंथरूण-पांघरूण व साहित्य गोळा करून सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. जर बीट गार्ड ब्राह्मणकर योग्य वेळी पोहोचले नसते, तर मोठी जीवितहानी झाली असती. मजुरांनी हात जोडून ब्राह्मणकर यांच्या सतर्कतेबद्दल त्यांचे आभार मानले.
नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान आणि लगतच्या जंगल परिसरात वन्यजीवांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकरी, मजूर, नागरिक व पर्यटकांनी रात्रीच्या वेळी जंगलालगत उघड्यावर मुक्काम करू नये. वनविभागाने दिलेल्या सुरक्षा नियमांचे व सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन वन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. बीट गार्ड विक्रांत ब्राह्मणकर यांनी दाखविलेल्या या धाडसाचे आणि कर्तव्यदक्षतेचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *