LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्र

दुष्काळाने हतबल झालेल्या शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर महामोर्चा अन् हल्लाबोल!

५ हजारांची सरसकट मदत, ५० हजारांची प्रोत्साहन राशी आणि कर्जमाफीसाठी एल्गार
सालेकसा :
भीषण दुष्काळाच्या झळांनी खरीप हंगाम पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून रब्बी हंगामही संकटात सापडला आहे. अशा विदारक परिस्थितीत शासनाकडून अद्यापही प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळत नसल्याने सालेकसा तालुक्यातील बळीराजाचा संताप अखेर उफाळून आला. सरसकट दुष्काळी मदत, प्रोत्साहनपर अनुदान आणि संपूर्ण कर्जमाफी या प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी (दि. २३ नोव्हेंबर) हजारो शेतकऱ्यांनी सालेकसा तहसील कार्यालयावर धडक देत शासनाविरोधात तीव्र हल्लाबोल केला. गगनभेदी घोषणांनी तहसील परिसर दणाणून सोडत शेतकऱ्यांनी आपल्या हक्कांसाठी संघर्षाचे रणशिंग फुंकले.
गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित केल्यानंतरही प्रत्यक्ष आर्थिक मदत खात्यात जमा होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत असल्याने आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शासनाने केवळ कागदोपत्री घोषणांचा पाऊस न पाडता प्रत्यक्ष मदतीची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी आंदोलनात करण्यात आली. दुष्काळग्रस्त सर्वच शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी निकष बाजूला ठेवून सरसकट ५ हजार रुपये आर्थिक मदत तात्काळ द्यावी. नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५० हजार रुपयांची प्रोत्साहन राशी त्वरित जमा करावी. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील वंचित व पात्र शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफीचा लाभ देऊन कर्जमुक्त करावे आदी मागणी करण्यात आली.
तीव्र आणि व्यापक जनआंदोलन उभारणार : माजी आ. सहसराम कोरोटे
या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करत देवरी-आमगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सहसराम कोरोटे यांनी शासनाच्या धोरणांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, “खरीप पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. बँकांचे कर्ज, खासगी देणी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न बळीराजासमोर उभा आहे. संकटाच्या या काळात शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन यापेक्षाही तीव्र आणि व्यापक जनआंदोलन छेडले जाईल.”
आश्वासने नकोत, थेट खात्यात मदत हवी!
“दुष्काळाचा फटका शेतकऱ्यांना, पिकांचे नुकसान शेतकऱ्यांचे आणि कर्जाचा डोंगरही शेतकऱ्यांच्याच माथी; मग हक्काच्या मदतीसाठी एवढी प्रतीक्षा का?” असा संतप्त सवाल सालेकसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला. आंदोलनाअंती सालेकसा तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आता शासन या महामोर्चाची दखल घेऊन प्रत्यक्ष मदतीचा निर्णय कधी घेते, याकडे संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *