पत्नीशी अनैतिक संबंधाचा राग; अकोल्यात नेऊन तरुणाची दगडाने ठेचून हत्या
यवतमाळच्या तरुणाचा अकोल्याजवळ निर्घृण खून | बेपत्ता तक्रारीवरून अवघ्या काही तासांत गुन्ह्याचा उलगडा | आरोपी पती गजाआड
यवतमाळ / अकोला: पत्नीसोबत बळजबरीने अनैतिक संबंध ठेवणाऱ्या आणि सातत्याने जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका गुंड प्रवृत्तीच्या तरुणाची पतीने दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी रात्री यवतमाळ येथून दुचाकीवरून अकोल्याला नेत असताना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा थरार घडला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. विक्की ऊर्फ बबलू राजू भेंडे (वय १९, रा. गुरुनानक नगर, गोधनी रोड, यवतमाळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर युवराज शंकर तांगडे (४२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मृत विक्की भेंडे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. त्याच्यावर यापूर्वी एका वृद्धाच्या हत्येचा गुन्हा दाखल होता. परिसरात दहशत माजवणार्या विक्कीने याच गुंडगिरीच्या जोरावर आरोपी युवराज तांगडे याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. युवराजने याला वारंवार विरोध करूनही विक्की ऐकत नव्हता, उलट तो युवराजलाच जिवे मारण्याची धमकी देत असे. सुखी संसाराची राखरांगोळी झाल्याने युवराजच्या मनात विक्कीबद्दल तीव्र संताप खदखदत होता.
गुरुवारी रात्री विक्कीने युवराजला रस्त्यात गाठून बळजबरीने दारू पाजण्याची मागणी केली. दोघेही यवतमाळच्या दत्त चौकातील एका बारमध्ये गेले. तिथे दारू पिताना त्यांच्यात जुन्या कारणावरून वाद झाला. पत्नीशी असलेल्या संबंधांबाबत कायमचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी दोघेही रात्रीच दुचाकीवरून अकोल्याला जाण्यासाठी निघाले. शुक्रवारी पहाटे अकोल्याजवळ एका निर्जनस्थळी शौचाच्या बहाण्याने ते थांबले. यावेळी विक्की पुन्हा युवराजच्या पत्नीबद्दल अश्लील आणि अपमानास्पद बोलू लागला. यामुळे रागाचा भडका उडालेल्या युवराजने विक्कीवर दगडाने जोरदार प्रहार केला. गंभीर जखमी झालेल्या विक्कीने “दगडाने नको, मला फाशी देऊन मार,” अशी शेवटची विनवणी केली. त्यावर युवराजने त्याच्याच टी-शर्टने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते न जमल्याने अखेर डोक्यावर मोठा दगड घालून युवराजने विक्कीला जागीच ठार केले आणि यवतमाळला परतला.
तक्रारीवरून असा झाला उलगडा
शुक्रवारी विक्की बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी यवतमाळच्या अवधूतवाडी पोलिसांत दाखल केली. तपासादरम्यान विक्की शेवटचा युवराजसोबत दिसल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने युवराजला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, त्याने हत्येची कबुली दिली.
ही घटना अकोला पोलिसांच्या हद्दीत घडल्याने अवधूतवाडी पोलिसांनी तत्काळ अकोला पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर शुक्रवारी रात्रीच अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने यवतमाळात दाखल होत आरोपी युवराजला ताब्यात घेतले. पुढील तपास अकोला पोलिस करत आहेत.

