वाघाची शिकार करणाऱ्या आरोपींना २ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
थाटेझरी बिटातील येथील घटना : विद्युतप्रवाहित करुन केली होती शिकार
सडक अर्जुनी: वनपरिक्षेत्र कार्यालय गोरेगाव अंतर्गत येणाऱ्या सहवनक्षेत्र कार्यालय, कोसमतोंडी, ता. सडक अर्जुनी मधील थाटेझरी ह्या गावाजवळ लागत असलेल्या कक्ष क्रमांक ९९ राखीव वन परिसरात सामुहिक ग्रस्त करीत असताना एका नर वाघाचा मृत्यू विद्युत प्रवाह लावून झाल्याची घटना १० नोव्हेंबर रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी वन विभागाने आठ आरोपींना अटक केली होती. १९ नोव्हेंबर रोजी सर्व आरोपींना सडक अर्जुनी न्यायालयात हजर करण्यात आले होते. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपींना २ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
आरोपींमध्ये रवी युवराज काशीवार (वय ४१), ढेकल चैतू पधरे (वय ६०), ओमप्रकाश डोमा पुसाम (वय ५०), रमेश गणपत कोडापे (वय ५९), महेंद्र प्रेमलाल कोडापे (वय ३२), मोहन कडू कोडापे (वय ६१), उमेश ढेकल पधरे (वय ३३), विनोद ऋषीपाल सराटे (वय ४४) सर्व रा. बोलूंदा ता. सडक अर्जुनी जि. गोंदिया यांचा समावेश आहे. या प्रकरणाची चौकशी क्षेत्र संचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, पियुषा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपसंचालक प्रीतमसिंग कोडापे, सहाय्यक वनसंरक्षक विपीन लांडगे, गोरेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी आयूशा लांबट यांनी केली. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २ (१६), ९, ३९, ५१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

