विमानतळ रस्त्यासाठी २८.३० कोटींचा निधी मंजूर
गोंदिया : तालुक्यातील बिरसी विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गाच्या विकासाला अखेर गती मिळणार असून, कामठा ते परसवाडा या पाच किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी राज्य शासनाने २८ कोटी ३० लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे. या संदर्भात गुरुवारी (दि. १९) शासननिर्णय जारी करण्यात आला असून, गोंदिया जिल्हा परिषदेने या कामाचा प्रस्ताव सादर केला होता.
चंगेरा-बनाथर-कोचेवाही-कामठा-परसवाडा या इतर जिल्हा मार्गावरील कामठा ते परसवाडा या पाच किलोमीटर रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. या रस्त्यासोबतच येथे हाइट बॅरियरही उभारण्यात येणार आहे. बिरसी विमानतळाच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गाची सुधारणा व्हावी, या उद्देशाने गोंदिया जिल्हा परिषदेकडून पाठपुरावा करून हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार शासनाने या कामाला मंजुरी दिली असली, तरी प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात करण्यापूर्वी भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाकडून ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) प्राप्त करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या कामासाठी मंजूर करण्यात आलेला २८ कोटी ३० लाख रुपयांचा निधी विमानतळ विकासासाठीच्या तरतुदीतून दिला जाणार आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला सहायक अनुदान देण्यासाठी निश्चित केलेल्या लेखाशीर्षाखाली हा खर्च करण्यात येईल तसेच संबंधित आर्थिक वर्षातील उपलब्ध तरतुदीतूनच हा निधी खर्च करण्याचे स्पष्ट निर्देश शासननिर्णयात देण्यात आले आहेत.

