आदिवासी गोवारी शहिदांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त २३ नोव्हेंबरला नागपूरला मोर्चा
गोंदियातून रेल्वेने जाण्यासाठी परवानगी व बंदोबस्ताची मागणी
गोंदिया : २३ नोव्हेंबर १९९४ रोजी नागपूर येथील झिरो माईल (टी-पॉईंट/बर्डी) परिसरात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी झालेल्या आंदोलनात ११४ आदिवासी गोवारी बांधव शहीद झाले. शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी नागपूर येथे ३२ व्या वर्षी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी गोंदिया जिल्ह्यातून आदिवासी गोवारी समाज बांधव रेल्वेने नागपूरकडे रवाना होणार आहेत. प्रवासादरम्यान कोणताही अडथळा किंवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांनी परवानगी व पोलीस बंदोबस्त द्यावा, अशी मागणी आदिवासी गोवारी समाज संघटनेचे गोंदिया जिल्हाध्यक्ष सुशील विठ्ठलराव राऊत यांनी केली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शहीद ११४ आदिवासी गोवारी बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. यासाठी नागपूर येथील झिरो माईल (टी-पॉईंट/बर्डी) परिसरात ३२ व्या वर्षी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्यभरातून आदिवासी गोवारी बांधव सहभाग होणार आहेत. दरम्यान गोंदिया जिल्ह्यातूनही आदिवासी गोवारी समाज बांधव रेल्वेने नागपूरकडे रवाना होणार आहेत. या संदर्भात आदिवासी गोवारी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुशील राऊत यांनी रेल्वे स्टेशन गोंदियाचे प्रधान प्रबंधक तसेच रेल्वे पोलीस स्टेशन गोंदिया (जीआरपी, आरपीएफ) यांच्या पोलीस निरीक्षकांना पूर्वसूचना व परवानगीसाठी निवेदन दिले आहे. सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ व ८ वाजता महाराष्ट्र एक्सप्रेस आणि लोकल गाडीने समाज बांधव बिल्ले व बॅनर लावून नागपूरकडे जाणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नागपूर येथील श्रद्धांजली कार्यक्रमाला जाणार्या बांधवांना कोणत्याही प्रकारची हानी किंवा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी रेल्वे स्थानक व प्रवासादरम्यान योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात करावा, अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच या दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय अथवा अशासकीय संपत्तीचे समाजाकडून नुकसान होणार नाही, याची हमीही संघटनेच्या वतीने देण्यात आली असून आवश्यक ती परवानगी देण्याची मागणी सुशिल राऊत यांनी केली आहे. निवेदन देताना आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्र गोंदिया जिल्हा अध्यक्ष सुशील राऊत, शारदा राऊत, प्रेमलाल सहारे, ओम राऊत, अरविंद राऊत, विलास राऊत, दीपक नेवारे, गौरव राऊत आदिंसह समाजबांधव उपस्थित होते.

