LatestNewsमहाराष्ट्र

दिवेआगर समुद्रकिनारी काळाचा घाला; पुण्यातील ‘विनर्स ॲकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

सहलीचा आनंद क्षणात विरला : पाण्याचा अंदाज न आल्याने अकरावी-बारावीचे विद्यार्थी लाटांच्या विळख्यात; सर्व आठ मृतदेह बाहेर काढले
रायगड :
रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर काळाने भीषण घाला घातला. समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील ‘विनर्स सायन्स ॲकॅडमी’च्या आठ विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. सोहम तुकाराम भांडवलकर, यश किरण वानखेडे, तन्मय दत्तात्रय वाहिले, कौस्तुभ संदीप दौंड, कैवल्य वासनकर, राजवीर वहिले, प्रणव बनसोडे
व सुमित अहिरे अशी मृतांची नावे आहेत. ही हृदयद्रावक घटना घडताच संपूर्ण दिवेआगर परिसरासह पुण्यात प्रचंड खळबळ उडाली असून सर्वत्र तीव्र शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आळंदी (जि. पुणे) येथील ‘विनर्स ॲकॅडमी’चे इयत्ता ११ वी आणि १२ वी विज्ञान शाखेचे सुमारे ३० ते ४० विद्यार्थी सहलीनिमित्त दिवेआगर समुद्रकिनारी आले होते. समुद्राच्या लाटांचा आनंद घेण्यासाठी काही विद्यार्थी पाण्यात उतरले. मात्र, समुद्राच्या पाण्याच्या खोलीचा आणि भरतीच्या वेगवान प्रवाहाचा अचूक अंदाज न आल्याने आठ विद्यार्थी खोल पाण्यात खेचले गेले आणि बुडू लागले. सोबतच्या मित्रांनी आरडाओरड केली, परंतु पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान असल्याने पाहता पाहता सोहम तुकाराम भांडवलकर, यश किरण वानखेडे, तन्मय दत्तात्रय वाहिले, कौस्तुभ संदीप दौंड, कैवल्य वासनकर, राजवीर वहिले, प्रणव बनसोडे व सुमित अहिरे हे आठही विद्यार्थी डोळ्यांसमोर दिसेनासे झाले. या दुर्दैवी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे वय १६ ते १८ वर्षांच्या दरम्यान असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
स्थानिकांची तत्परता; सर्व मृतदेह बाहेर काढले
घटनेची माहिती मिळताच दिवेआगर येथील महाकाली वॉटर स्पोर्ट्सचे संचालक भाऊ मारुती साळुंखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोणताही विलंब न करता स्पीड बोटींच्या साहाय्याने समुद्रात तात्काळ शोधमोहीम हाती घेतली. अथक प्रयत्नांनंतर समुद्रातून आठही विद्यार्थ्यांचे मृतदेह शोधून बाहेर काढण्यात यश आले. घटनेचे वृत्त समजताच स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी, महसूल प्रशासन आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सर्व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या अत्यंत दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच आळंदी व पुणे परिसरात विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाइकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. दरम्यान, विद्यार्थी ज्या ठिकाणी समुद्रात उतरले होते, तेथे धोक्याचा इशारा होता का? समुद्राची सद्यस्थिती काय होती आणि ॲकॅडमीच्या आयोजकांकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुरेशी खबरदारी घेण्यात आली होती का, या सर्व बाबींची पोलीस व प्रशासनाकडून सखोल चौकशी केली जात आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *