HealthLatestगोंदियाविदर्भ

सावरटोला येथील शेतकरी यादवराव तरोणे यांचा नावीन्यपूर्ण शेतीचा यशस्वी प्रयोग

अर्ध्या एकरात तैवान पेरूची बाग फुलवली; तरोणे कुटुंबाला वर्षाकाठी दोन ते तीन लाखांचे उत्पन्न
नवेगावबांध (गोंदिया) :
शेतीमध्ये नवनवीन प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञान आणि मेहनतीची जोड दिल्यास कमी क्षेत्रातही चांगले आर्थिक उत्पन्न मिळविता येते, हे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सावरटोला येथील शेतकरी यादवराव पाटील तरोणे यांनी आपल्या यशस्वी प्रयोगातून सिद्ध करून दाखविले आहे. अवघ्या अर्ध्या एकर शेतीमध्ये तैवान पेरूच्या ४०० झाडांची लागवड करून त्यांनी फळबाग शेतीतून कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून दिले आहे.
यादवराव तरोणे यांनी जून २०२४ मध्ये आपल्या शेतातील अर्ध्या एकर क्षेत्रात गर्द पद्धतीने तैवान पेरूच्या ४०० रोपांची लागवड केली. विशेष म्हणजे लागवडीनंतर अवघ्या तेराव्या महिन्यापासूनच या बागेतून उत्पादन सुरू झाले. सध्या ही बाग हिरव्यागार पानांनी आणि फळांनी बहरली असून, कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयोग यशस्वी ठरत आहे.
तैवान पेरूची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असून, तुलनेने कमी मेहनतीत चांगले उत्पादन मिळविण्याची क्षमता या पिकात आहे. या बागेतून कुटुंबाला वर्षाकाठी अंदाजे दोन ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. एकदा लागवड केल्यानंतर मोठ्या प्रमाणात अतिरिक्त खर्च येत नसल्याने हा प्रयोग आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरत असल्याचे चित्र आहे.
या यशस्वी फळबागेची पाहणी करण्यासाठी तालुका शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष देवरामजी कोरे यांनी भेट दिली. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि मेहनतीने जोपासलेली पेरूची बाग पाहून त्यांनी शेतकरी यादवराव तरवणे यांचे विशेष कौतुक केले. ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उपलब्ध असलेल्या अल्पशा शेतीमध्ये अशा प्रकारचे फळबाग लागवडीचे प्रयोग करावेत. त्यातून स्वतःचा रोजगार निर्माण करण्याबरोबरच फळ उत्पादनाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीला हातभार लावावा, असे आवाहन देवराम कोरे यांनी यावेळी केले.
तर यांचे कुटुंब लहान असून, या बागेच्या उभारणीपासून संगोपनापर्यंत संपूर्ण कुटुंबाचा मोठा वाटा आहे. त्यांचा मुलगा सुरेश तरोणे, पत्नी रेखा तरोणे, सून आणि स्वतः यादवराव हे सर्वजण एकत्रितपणे मेहनत घेऊन बागेची जोपासना करतात. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या परिश्रमातून ही बाग आज फळांनी बहरली आहे.
पेरू हे नगदी पीक असल्याने त्याच्या विक्रीतून नियमितपणे पैशांची आवक होत असते. त्यामुळे आता कुटुंबाच्या आर्थिक गरजांची चिंता कमी झाली असून, या फळबागेमुळे कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे, असे समाधान यादवराव तरोणे यांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श
आज शेतीमध्ये वाढता उत्पादन खर्च, नैसर्गिक संकटे आणि पारंपरिक पिकांमधून मिळणारे मर्यादित उत्पन्न या पार्श्वभूमीवर सावरटोला येथील तरवणे यांचा तैवान पेरू लागवडीचा प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कमी क्षेत्रात नियोजनबद्ध फळबाग उभारून कुटुंबाच्या श्रमातून आर्थिक समृद्धी साधता येते, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *